
या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी सजली आहे. थ्रिलर, क्राइम, ड्रामा, कॉमेडी आणि सस्पेन्स या विविध जॉनरमधील सिनेमे आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा ‘निशांची’, तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’ आणि अक्षय कुमार व अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटांचाही समावेश आहे.

जॉली एलएलबी ३ । नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार
जॉली एलएलबी या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा आणि विनोद यांचा अफलातून संगम पाहायला मिळणार आहे. दोन वकील जगदीश ‘जॉली’ त्यागी (अरशद वारसी) आणि जगदीश्वर ‘जॉली’ मिश्रा (अक्षय कुमार) यांच्या संघर्षातून एका शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जमीन घोटाळ्याची कथा उलगडते. अक्षय कुमार, अरशद वारसीसोबत अमृता राव, हुमा कुरैशी, सीमा बिस्वास, गजराज राव, राम कपूर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

दशावतार । झी-५
‘दशावतार’ हा मराठी सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. दिलीप प्रभावळकर यांनी यात बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारली आहे. कोकणातील पारंपरिक दशावतार नाटक आणि पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या योजनेविरोधातील संघर्ष यावर हा चित्रपट भाष्य करतो. माधवच्या हत्येनंतर बाबुली आणि त्याची मैत्रीण वंदना, दशावतारच्या पौराणिक कथांमधून प्रेरणा घेऊन गुन्हेगारांना शिक्षा देतात. सामाजिक संदेश आणि कलात्मक सादरीकरणामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.

निशांची । प्राइम व्हिडीओ
‘निशांची’ हा क्राइम ड्रामा प्रकारातील सिनेमा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे यात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गुन्हेगारी जगत, सत्तेचा गैरवापर आणि नैतिक संघर्ष या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नसली तरी समीक्षकांकडून प्रशंसा मिळवली आहे. ऐश्वर्य ठाकरेसह चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पवार, कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, विनीत कुमार सिंह यांच्या प्रमूख भूमिका आहे.
इन्स्पेक्शन बंगलो । झी-५
शबरेश वर्मा, शाजू श्रीधर, जयन चेरथला, वीणा नायर, बालाजी सरमा, सेंथिल कृष्णा राजमणी, श्रीजीत रवी अभिनीत ही मूळ मल्याळम भाषेतील हॉरर-कॉमेडी वेब सीरिज आहे. एका जुन्या बंगल्यात घडणाऱ्या रहस्यमय आणि विनोदी घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांना थरार आणि हास्याचा समतोल अनुभव देणार आहे.
जुरासिक पार्क रिबर्थ । जिओहॉटस्टार
‘जुरासिक वर्ल्ड डोमिनियन’ (२०२२) नंतरचा हा स्वतंत्र सिक्वेल आहे. या कथेत झोरा बेनेट आणि तिची संशोधन टीम पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्रदेशात प्रवास करते. अशा ठिकाणी जिथे नष्ट झालेल्या डायनासोर प्रजातींच्या जनुकीय पदार्थांचा शोध घेतला जातो. हे संशोधन मानवजातीच्या भविष्यासाठी जीवनदायी ठरू शकते. रोमांचक आणि अॅक्शनने भरलेला हा सिनेमा डायनासोर चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. स्कार्लेट जोहान्सन, जोनाथन बेली, महेरशाला अली यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

नूव्हेल व्हेग । नेटफ्लिक्स
‘नूव्हेल व्हेग’ हा सिनेमा दिग्दर्शक जाँ-ल्यूक गॉदार यांच्या १९६० मधील प्रसिद्ध ब्रथलेस या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित आहे. यात एका तरुण समीक्षकाची कथा दाखवली आहे जो आपल्या सहकाऱ्यांच्या प्रेरणेने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकतो आणि स्वतःचा पहिला चित्रपट बनवताना येणाऱ्या दबावांना सामोरे जातो.
लेफ्टर: द स्टोरी ऑफ द ऑर्डिनेरियस । नेटफ्लिक्स
हा बायोपिक तुर्कीतील प्रसिद्ध फुटबॉलपटू लेफ्टर क्युचुकांडोनियादिस यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणापासून ते आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवण्यापर्यंतचा प्रवास, त्यांच्या प्रेमकथेतील चढ-उतार, तसेच ग्रीक वारसा हे सर्व घटक या चित्रपटात सखोलपणे मांडले आहेत. फुटबॉलप्रेमींसाठी हा चित्रपट एक प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

कम सी मी इन द गुड नाईट । अॅपल टीव्ही
हा भावनिक माहितीपट कवयित्री आणि कार्यकर्त्या अँड्रिया गिब्सन आणि तिची जोडीदार मेगन फॅली यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गिब्सन यांना स्टेज-फोर ओव्हेरियन कॅन्सरचे निदान झाल्यानंतर या जोडप्याने अनुभवलेली प्रेमकथा, संघर्ष, दु:ख आणि उपचारांचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांच्या नात्यातील दृढ प्रेम आणि आशेचा संदेश प्रेक्षकांना भावूक करेल.