‘परम सुंदरी’सह अनेक धमाकेदार चित्रपट, सिरीजची मेजवानी


23rd October, 11:21 pm
‘परम सुंदरी’सह अनेक धमाकेदार चित्रपट, सिरीजची मेजवानी


या आठवड्यात प्रेक्षकांसाठी एकाहून एक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि जिओ हॉटस्टार या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात मनोरंजनाचा महापूर येणार आहे.

परम सुंदरी । अमेझॉन प्राइम व्हिडीओ

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका श्रीमंत दिल्लीकर मुलाच्या भूमिकेत असून जो एआय ॲपच्या माध्यमातून आपल्या जीवनसाथीचा शोध घेतो आणि त्याची भेट होते केरळच्या सुंदर मुलीशी म्हणजेच जान्हवी कपूरशी होते. रोमँस, कॉमेडी आणि टेक्नॉलॉजीचे मिश्रण असलेला हा चित्रपट तरुण प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

ओजी । नेटफ्लिक्स

पवन कल्याणचा दमदार ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘ओजी’ या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा ओजस गंभीर ऊर्फ ‘ओजी’ या समुराई योद्ध्याभोवती फिरते, जो दोन व्यावसायिकांचे प्राण वाचवतो. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे अभिनेता इमरान हाश्मीने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

कुरुक्षेत्र पार्ट २ । नेटफ्लिक्स

महाभारतावर आधारित हा ॲनिमेटेड सीझन २ पुन्हा एकदा पांडव आणि कौरवांच्या महान युद्धाची गाथा सांगणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजामुळे ही मालिका अधिक प्रभावी ठरते.

 

द कार्दशियन्स सीझन ७ । जिओ हॉटस्टार

किम कार्दशियन आणि तिच्या बहिणी पुन्हा एकदा ग्लॅमर आणि ड्रामासह परतल्या आहेत. या सीझनमध्ये कौटुंबिक भांडणे, प्रेमकहाण्या आणि व्यवसायातील शर्यती आणखी मसालेदार पद्धतीने मांडल्या जाणार आहेत.


लाजरस । अमेझॉन प्राइम व्हिडीओ
हार्लन कोबेन लिखित या मानसशास्त्रीय थ्रिलर सीरिजमध्ये सॅम क्लॅफ्लिन एका मानसशास्त्रज्ञाची भूमिका साकारतो, जो आपल्या वडिलांच्या आत्महत्येनंतर जुन्या खून प्रकरणांचा शोध घेत असतो. पण गोष्टी गुंतागुंतीच्या होतात, जेव्हा त्याला त्याच्या मृत वडिलांचे भूत दिसू लागते.

 

अ हाऊस ऑफ डायनामाइट । नेटफ्लिक्स

इद्रिस एल्बा, रेबेका फर्ग्युसन आणि गॅब्रिएल बासो यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट अमेरिकेतील उच्च सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्रित आहे. कथानक एका भीषण संकटाभोवती फिरते जेव्हा अमेरिकेकडे एक अदृश्य क्षेपणास्त्र सोडले जाते आणि शिकागो शहराला मोठा धोका निर्माण होतो. वेळेविरुद्धच्या या शर्यतीत अधिकारी हे संकट टाळण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे तितकेच थरारक ठरणार आहे.

शक्ती थिरुमगन । जिओहॉटस्टार

विजय अँटनी यांच्या प्रमुख भूमिकेतला हा राजकीय थ्रिलर चित्रपट एका बुद्धिमान आणि प्रभावशाली लॉबीस्टची कहाणी सांगतो. एका कार्यकर्त्याने वाढवलेला हा तरुण, आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मोहिमेवर निघतो. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा तो आपल्या राजकीय कौशल्य आणि प्रभावाचा वापर करून भ्रष्ट व्यवस्थेला आतून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो.

 

पॅरिश । नेटफ्लिक्स

ही एक गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत सिरीज आहे. ज्यात ग्रे पॅरिश या पात्राचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ग्रे पॅरिश हा एक माजी गुन्हेगार आहे. जो आता आपले आयुष्य बदलून लक्झरी कार सर्व्हिस चालवणारा कुटुंबवत्सल माणूस बनतो. पण त्याच्या मुलाच्या हत्येनंतर आणि जुन्या शत्रूंच्या पुनरागमनानंतर तो पुन्हा गुन्हेगारी जगात ओढला जातो.