पणजी: गोमंतकीय कलाविश्वासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे! कोकणी भाषेतील 'आसेसांव' (Ancessao) या लघुपटासाठी (Short Film) गोव्याच्या प्रशांती तळपणकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. टोरंटो, उत्तर अमेरिका येथे आयोजित 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया' (IFFSA) या १४ व्या आवृत्तीमध्ये प्रशांती तळपणकर यांना आंतरराष्ट्रीय श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actor) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'आसेसांव'ची कथा काय आहे?
दिग्दर्शक मांगीरिश बांदोडकर यांचा हा ३० मिनिटांचा कोकणी लघुपट आहे. गोव्याची संस्कृती आणि जीवनशैली यात आहेच, पण त्याला 'डार्क ह्युमर'ची (Dark Humour) जोड देण्यात आली आहे. 'आसेसांव'ची कथा मानसिक आरोग्य, एकटेपणा आणि वृद्धत्व या गंभीर विषयांना स्पर्श करते. परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या गोव्यातील एका कॅथलिक वृद्ध महिलेचे जीवन यात रेखाटले आहे. गॉसिप (Gossip) हेच तिच्या मनोरंजनाचे एकमेव साधन बनते, जी कोणत्याही गोमंतकीय घरांना लागू होणारी परिस्थिती आहे. 'IFFSA टोरंटो' या उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलेला हा एकमेव गोमंतकीय आणि कोकणी चित्रपट होता.
प्रशांती तळपणकर यांची तयारी
अभिनयासाठी पुरस्कार जिंकणाऱ्या प्रशांती तळपणकर यांनी 'आसेसांव'च्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची ठरली. 'आसेसांव' हे बांदोडकर यांच्यासोबत त्यांचे पहिलेच सहकार्य आहे. त्यांनी मागेच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रशांती तळपणकर म्हणाल्या, मी 'आसेसांव'ची स्क्रिप्ट जवळपास दहा वेळा वाचली. स्थानिक भाषेतील उच्चार (Local Accent) आणि अनेक वर्षांच्या निरीक्षणातून मी ही भूमिका साकारली. वाकलेल्या पाठीची (Hunchback Posture) भूमिका करणे हे मोठे आव्हान होते. चांदोर येथील एका महिलेचे बारकाईने निरीक्षण करून मी ही देहबोली आत्मसात केली.".
दिग्दर्शक आणि निर्मिती
या लघुपटाचे दिग्दर्शक बांदोडकर हे पणजी येथील शासकीय पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून प्रशिक्षित असून, त्यांनी नंतर 'विन्सन अकादमी'तून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले. 'आसेसांव'साठी त्यांना अनेक आर्थिक अडचणींवर मात करावी लागली. ही कथा २०२२ मध्ये लिहिली गेली आणि २०२४ मध्ये चित्रीकरणाला सुरुवात होऊन २०२५ मध्ये पूर्ण झाली.
या लघुपटाचे चित्रीकरण दक्षिण गोव्यातील चांदोर, कुडतरी आणि कुंकळ्ळी यांसारख्या विविध गावांमध्ये अवघ्या सहा दिवसांत पूर्ण करण्यात आले. चित्रपटात ३३ कलाकारांनी काम केले असून, अल्टन कौटिन्हो (कार्यकारी निर्माता/लेखक) आणि आशिष नागवेंकर (सह-लेखक) यांच्यासह अनेक कलाकारांनी पडद्यामागे काम केले आहे. या पुरस्कारामुळे गोव्यातील चित्रपट निर्मितीच्या वाढत्या गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.