
घनदाट जंगल, कातळशिल्प, दमदार कलाकारांचा अभिनय आणि मनाला भावणारे पार्श्वसंगीत अशा सगळ्यांचा संगम असलेला ‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमुळे या सिनेमाने सिनेप्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
कोकणाच्या लाल मातीतील संस्कृती आणि लोककलेवर आधारित या सिनेमाची कथा कोकणातील राखणदाराभोवती फिरते. नेमका राखणदार कोण आहे, हे रहस्य मात्र प्रेक्षकांना चित्रपटगृहातच उलगडणार आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर ‘बाबुली मिस्त्री’ची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ भाषेतून नव्हे तर चित्रभाषेतून भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. त्यामुळेच दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि निर्माते आदित्य जोशी यांनी सबटायटलशिवायच बिगरमराठी प्रेक्षकांना हा सिनेमा दाखवला होता आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. चित्रपट स्थानिक असला तरी त्याचा संदेश जागतिक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘दशावतार’ने जागतिक पातळीवरही आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. नुकतीच या चित्रपटाची झलक न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरमध्ये दाखविण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच परदेशातील प्रेक्षकांचेही लक्ष या सिनेकडे लागले आहे.
मराठी सिनेसृष्टीत नवा अध्याय लिहिणारा, संस्कृतीशी नाळ जोडणारा आणि ग्लोबल स्तरावर पोहोचण्याचे बळ असलेला ‘दशावतार’ शुक्रवारी (१२ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि परदेशात प्रदर्शित होत आहे.