या आठवड्याच्या शुक्रवारी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका असलेली कॉमेडी सिरीज ‘डू यू वॉना पार्टनर’ विशेष आकर्षण ठरणार आहे.
डू यू वॉना पार्टनर । अमेझॉन प्राइम व्हिडिओ
तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी यांची मुख्य भूमिका असलेली ही कॉमेडी-ड्रामा सिरीज आहे. दोन जिवलग मैत्रिणी स्वतःचा क्राफ्ट बिअर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतात. मात्र पुरुषप्रधान उद्योगक्षेत्रात त्यांचा प्रवास किती कठीण ठरतो, हे या कथेत पाहायला मिळते. यात जावेद जाफरी, नकुल मेहता, नीरज काबी, श्वेता तिवारी, रणविजय सिंग आणि सुफी मोतीवाला यांच्याही भूमिका आहेत.
सैयारा । नेटफ्लिक्स
मोहित सुरी दिग्दर्शित हा म्युझिकल रोमँटिक चित्रपट क्रिश कपूर या उत्कट, पण त्रस्त संगीतकाराभोवती फिरतो. तो आपल्या संगीत कारकिर्दीत नाव कमवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याची भेट हृदयभंगातून सावरत असलेल्या कवयित्री वाणी बत्राशी होते. दोघे मिळून एक गाणे तयार करताना प्रेम आणि आवड पुन्हा शोधतात. कोरियन चित्रपट अ रिमेम्बर मोमेंट (२००४) वर आधारित या चित्रपटात आहान पांडे आणि अनीत पड्डा प्रमुख भूमिकेत आहेत.
यू अँड एव्हरीथिंग एल्स । नेटफ्लिक्स
हा एक भावनिक काेरियन ड्रामा मालिका आहे. दोन स्त्रियांच्या नात्यात निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांच्या आयुष्याला मोठा कलाटणी मिळते. त्यापैकी एकीच्या कठीण काळात दुसरीला तिच्यासोबत राहावे लागते आणि त्यातून घडणारी कथा दाखवण्यात आली आहे. यात किम गो-युन, पार्क जी-ह्युन आणि किम गुन-वू मुख्य भूमिकेत आहेत.
एव्हरी मिनिट काउंट्स (सीझन २) । अमेझॉन प्राइम व्हिडिओ
या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये १९८५ च्या मेक्सिको सिटीतील भूकंपानंतरच्या घटना दाखवल्या आहेत. डॉ. आंजेल ढिगाऱ्याखाली अडकलेले असतात आणि त्यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. कथेत सैन्याशी संबंधित एक गडद गुपित उघड करण्यात आले आहे.
रॅम्बो इन लव्ह । जिओहॉटस्टार
ही तेलुगु रोमँटिक कॉमेडी आहे. एका उद्योगपतीचा व्यवसाय दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतो. त्याला वाचवण्यासाठी निधीची गरज असते. त्यावेळी एक गुंतवणूकदार पुढे येतो, पण तोच गुंतवणूकदार म्हणजे त्याची पूर्वी फसवणूक केलेली प्रेयसी निघते.
मॅलेडिक्शन्स । नेटफ्लिक्स
ही एक रोमहर्षक क्राईम थ्रिलर सिरीज आहे. उत्तरेकडील अर्जेंटिनामध्ये राज्यपालाच्या मुलीचे अपहरण होते. तिच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी राज्यपालाला कठीण निर्णय घ्यावा लागतो.
रातु रातु क्वीन्स: द सीरीज । नेटफ्लिक्स
अली अँड रातु रातु क्वीन्स (२०२१) या चित्रपटाचा सिक्वेल असलेली ही मालिका चार हटके इंडोनेशियन महिलांच्या आयुष्याभोवती फिरते. न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांना आलेल्या अडचणी, आव्हाने आणि त्यांचा संघर्ष यामध्ये दाखवला आहे.