या आठवड्यात ओटीटीवर थरार, रोमान्स, ड्रामा, अॅक्शन आणि सर्व्हायवल अशा विविध प्रकारच्या कथांचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे. या यादीत कोरियन थ्रिलरपासून ते फ्रेंच रोमान्स, भारतीय क्राइम ड्रामा आणि हॉलिवूड मिनीसीरीज अशा रंगीबेरंगी कंटेंटचा समावेश आहे.
मँटिस । नेटफ्लिक्स
कोरियन अॅक्शन थ्रिलर मँटिस हा किल बोक्सून (२०२३)च्या युनिव्हर्सशी जोडलेला आहे. या कथेत हान-उल उर्फ मँटिस नावाचा सुपारी किलर दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा गुन्हेगारी जगात परततो. पण त्याला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. नवे नियम, नवे खेळाडू या सगळ्यात टॉप असॅसिन म्हणून कोण उदयास येणार, हा रहस्यपूर्ण प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. या सिरीजमध्ये यिम सी वान, पार्क ग्यू यंग, जो वू जिन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
ऑल ऑफ यू । अॅपल टीव्ही+
विल्यम ब्रिजेस दिग्दर्शित हा एक भावस्पर्शी रोमँटिक चित्रपट आहे. सायमन (ब्रेट गोल्डस्टीन) आणि लॉरा (इमोजेन पूट्स) हे जिवलग मित्र आहेत. अनेक वर्षे एकमेकांविषयी मनात दडवून ठेवलेल्या भावना एका फ्यूचरिस्टिक सोलमेट क्विझमुळे उघडकीस येतात. या क्विझमुळे त्यांच्या नात्याची खरी कसोटी लागते.
फ्रेंच लव्हर्स । नेटफ्लिक्स
पॅरिस येथील रोमान्सने भरलेली ही कथा ओमर सी आणि सारा गिरॉडो यांच्या अभिनयाने सजली आहे. एक यशस्वी पण जीवनात असमाधानी असलेला चित्रपट अभिनेता आणि आर्थिक अडचणीत असलेली वेट्रेस यांच्यात फुलणारे नाते हे या चित्रपटाचे हृदय आहे. उच्चभ्रू आणि साधेपणाचा संगम प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
डेंजरस अॅनिमल । लायन्सगेट प्ले
हा सर्व्हायवल थ्रिलर समुद्राच्या लाटांसारखा रोमांचक आहे. झेफायर नावाची एक मोकळ्या स्वभावाची सर्फर एका शार्क-ऑब्सेस्ड सिरियल किलरकडून अपहरण केली जाते. ती त्याच्या बोटीतून सुटू शकेल का? तिचा साथीदार मोजेस तिला वाचवू शकेल का? जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली वेळेशी स्पर्धा प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवेल.
जनावर: द बीस्ट विदिन । झी ५
या सिरीजमध्ये भुवन अरोरा उपनिरीक्षक हेमंत कुमार यांची भूमिका साकारात आहे. जेव्हा शहरात एक शीरविरहित मृतदेह, गायब झालेले सोने आणि एका संशयिताचे रहस्यमय गायब होणे अशी थरारक मालिका घडते, तेव्हा हेमंतचे आयुष्य पूर्णपणे बदलते. गुन्हेगारी थ्रिलरमध्ये रहस्य आणि रोमहर्षक वळणांचा हा खेळ प्रेक्षकांना तल्लीन करून ठेवणार आहे.
द सावंत । अॅपल टीव्ही+
जेसिका चेस्टेनच्या अभिनयाने उजळलेली ही मिनीसीरीज एका सत्यकथेवर आधारित आहे. २०१९ मध्ये कॉस्मोपॉलिटन मासिकात प्रकाशित झालेल्या कथेतून प्रेरणा घेऊन तयार केलेली ही मालिका जोडी गुडविन हिच्या जीवनावर आधारलेली आहे. ऑनलाईन हेट ग्रुपमध्ये घुसखोरी करून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक हल्ले थांबवण्याचा तिचा प्रवास हा या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मेलिसा जेम्स गिब्सनने केले आहे.
रूथ आणि बोअज । नेटफ्लिक्स
बायबलमधील रूथ आणि बोअज यांच्या प्रेमकथेचं आधुनिक रूपांतर या सिरीजमध्ये पहायला मिळत आहे. टेनेसी राज्यात घडणारी ही कथा अटलांटाच्या संगीतविश्वातून निवृत्त होऊन आपल्या सरोगेट आईची सेवा करण्यासाठी आलेल्या एका तरुणीभोवती फिरते. तिच्या आयुष्यात अचानक प्रेमाचा प्रवेश होतो आणि जीवनाला एक नवे ध्येय मिळते. या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत सिराया, टायलर लेप्ले, फेलिशा रशाद आहेत.