पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावले गोव्याचे वायंगणकर कुटुंबीय
पणजी : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे असलेल्या मिनी स्वित्झर्लंड ठिकाणी मंगळवारी दुपारी २.४५ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळापासून केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेले पोलीस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर कुटुंबीय अगदी थोडक्यात बचावले. त्यांनी केंद्रीय रिझर्व पोलीस दल (सीआरपीएफ) बेस कॅम्पवर काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळेच त्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
पोलीस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर हे आपल्या कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेले होते. सोमवारी गुलमर्गमध्ये पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर मंगळवारी ते बैसरन येथे गेले होते. ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैसरन येथील सीआरपीएफ कॅम्पजवळ पोहोचले. तेथून मिनी स्वित्झर्लंड ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी घोड्यावरुन प्रवास करावा लागतो. त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. त्यामुळे तिथे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी दुपारी अडीजच्या सुमारास मिनी स्वित्झर्लंड या स्थळावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथे जाण्यासाठी वायंगणकर कुटुंबाने घोड्यावर बसून जाण्यास सुरुवात केली. दरम्यान, वायंगणकर यांच्या पत्नीला प्रवासात थकल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कुटुंबीयांनी आणखीन थोडा वेळ कॅम्पवर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
याच दरम्यान मिनी स्वित्झर्लंड येथे दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला सुरू झाला होता. हल्ला झालेल्या ठिकाणाहून पर्यटक माघारी परतले. यानंतर कॅम्प भागातील अन्य पर्यटकांना देखील अन्यत्र हलवण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरमधून माघारी फिरताहेत गोमंतकीय
आणखी काही गोमंतकीय दांपत्य या दहशतवादी हल्ल्यापासून बचावले गेल्याची माहिती मिळाली आहे. हे पर्यटक या स्थळावरून पंधरा मिनिटे आधी बाहेर पडले होते. जम्मू आणि काश्मीरच्या अन्य भागात २६ गोमंतकीय पर्यटक असून ते आता गोव्यात परत येत आहेत.