ज्या डॉक्टरांचे सामान साध्या बसवरून आले होते, त्यांना निरोप द्यायला सगळे गावकरी जमले होते आरोग्य केंद्रात. कधी कोणाला छदाम न देणाऱ्या मोगराने प्रेमाने डॉक्टरांच्या हातात कडे चढवले सोन्याचे.
आमचे गाव, अगदी सर्व लिखाणात मी आवर्जून सांगते त्याप्रमाणे सुंदर, टुमदार वगैरे सगळे काही. आता गावात व आसपासच्या वाड्यावर मिळून जवळजवळ १०० पेक्षा जास्त घरे नक्कीच होती. प्रायव्हेट बस व्यतिरिक्त दुसरी सुधारणेची साधने, सोयी गावाला माहिती नव्हत्या आणि गरजेच्याही नव्हत्या.
पण नंतर पंचायतीत आलेल्या सुधारणावादी पंचामुळे म्हणा, किंवा सरकारी उदारतेमुळे म्हणा, सामाईक विहिरी, डांबरी रस्ते, वीज वगैरे सुखसोयी गावात आल्या खऱ्या, नंतर त्यातच एक भर पडली ती म्हणजे आरोग्य केंद्र.
बस स्टँडजवळ प्रथमत: एक आरोग्य केंद्र उघडले. आम्ही लहान होतो तेव्हा. एक नर्स आणि एक सहाय्यक. बस्स! एवढा जबरदस्त स्टाफ अख्ख्या गावाकरिता. डॉक्टर हा प्रकार तेव्हा गावात माहितही नव्हता. आणि तेव्हा गरजेचाही नव्हता. जखम झाली की झाडपाला, थंडीला आडूळश्याच्या पानाचा काढा आणि शेवटी दृष्ट काढणे, एवढेच उपाय माहीत.
अश्यावेळी गावात आठवड्यातून दोन दिवस का होईना डॉक्टर येऊ लागले. तसे शाळेत लसीकरणाचा कॅम्प असे आणि त्यावेळी हमखास ताप येईच. त्यामुळे डॉक्टर ह्या प्रकाराबद्दल एक भीतीच बसली होती. लहानपणी डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप येतो अशीच मनाची समजूत. असो!
गावात पहिलाच आलेला डॉक्टर गोरापान, उंच, तगडा असा क्रिस्ताव होता. फर्नांडिस असे नाव. अतिशय रागीट आणि सतत सिगारेट ओढणारा, त्यांना गावकऱ्यांशी काहीच देणे घेणे नव्हते. नंतर असेच एक दोन जण आले. आरोग्य केंद्राबाबत अजूनही उदासीनताच होती.
आणि एक दिवस सकाळी सावर्ड्याहून येणाऱ्या बसच्या टपावरून सामान उतरले. आम्ही त्याचवेळी शाळेत जात होतो. दोन चार गाठोडी, बॅगा वगैरे, काय माहीत कोणाचे? संध्याकाळी आई, बाबांना सांगताना ऐकले की गावात आता फिक्स डॉक्टर येणार म्हणून आणि दुसऱ्या दिवशी आगमन झाले ‘फिक्स डॉक्टरांचे’. ज्या घरात आरोग्य केंद्र होते त्याच्या शेजारील घरातच डॉक्टरांची सोय होती राहाण्याची. शाळेतून त्या दिवशी घरी येताना हळूच पाटी वाचली. आरोग्य केंद्रावर डॉक्टर नारायण जोशी आणि पुढे बारीक अक्षरात काहीतरी लिहिले होते ते काही कळले नाही.
त्यातच एक दिवस आई आजारी पडल्याने वेळ आली डॉक्टरकडे जायची. आरोग्य केंद्रात एक किरकोळ शरीरयष्टीचा पोरगेलासा माणूस खुर्चीत बसला होता. उंची साधारणत: पाच फूट वगैरे. आईला तपासून त्यांनी काही औषधे दिली आणि मग मला जवळ बोलावून चॉकलेट. मी खूश झाले जराशी. म्हटले हा डॉक्टर सुई टोचणारा दिसत नाही.
तर असे हे जोशी डॉक्टर. हळूहळू गावात लोक ओळखू लागले त्यांना. आपला लाघवी स्वभाव व डोळे बंद करून समोरच्याशी बोलायची त्यांची लकब गावकऱ्यांना तरी नवी दादच होती. आरोग्य केंद्रात गर्दी वाढू लागली. डॉक्टरही हसतमुख चेहऱ्याने सगळ्यांना तपासात असत. आणि मुख्य म्हणजे सुईच्या भानगडीत जास्त न पडता औषधावर निभवित.
डॉक्टर जोशी तसे पेशाने वैद्यकीय क्षेत्रात असले, तरी पुस्तकांची आवड होती त्यांना. दुपारी दवाखाना बंद झाल्यावर व्हरांड्यात नेहमी पुस्तक वाचताना दिसत ते. आठवड्यातून एक दिवस सर्व वाड्यावर मदतनिसाबरोबर चालत फिरत व सरकारी योजनांची माहिती सर्वांना देत, अर्थात आमच्या डोक्यावरून जरी त्या गेल्या तरी अनेकांनी त्याचा फायदा जरूर करून घेतला होता.
आमच्या गावात मोगराबाई म्हणून एक सुईण होती. मोठी गर्विष्ठ. आपल्यालाच जास्त कळते, कोण हा डॉक्टर असे सतत म्हणे ती. एकदा तिची सून बाळंतपणात अडली, आता सासू सुईण, अर्थात घरातच सगळे बाळंतपण. पण काही केल्या सुटका होईना. सरते शेवटी मोगराच्या मुलाने जोशी डॉक्टरांना आणले घरी. डॉक्टर खोलीत गेले, बाहेरून मोगऱ्याच्या शिव्यांचा आवाज येत होता. थोड्यावेळाने घरातून दोन आवाज ऐकू येऊ लागले. एक मोगऱ्याच्या शिव्यांचा आणि दुसरा ट्याँहा ट्याँहा असा रडणाऱ्या बाळाचा. थोड्यावेळाने मोगऱ्याचा आवाज बंद आणि बाळाचा आवाज जास्त. असे समीकरण झाले. मोगऱ्याने गहिवरून पाय धरले जोशी डॉक्टरांचे. ह्या घटनेमुळे पंचक्रोशीत मान वाढला डॉक्टरांचा.
आधी थोडे दिवस डॉक्टर एकटेच राहत. मग एक दिवस बिऱ्हाड आले त्यांचे. त्यांची पत्नी खरेच त्यांना शोभेशी होती. उच्चभ्रू घरातील दिसत होती. मुलगा होता त्यांना माझ्या भावाच्या वयाचा. आमच्याशी लगेच दोस्ती जमली त्यांची.
आठवडा भर गावात उपलब्ध असणारे डॉक्टर रविवारी सकाळी मात्र गायब होत ते अगदी दुपार टळून गेल्यावर येत असत. प्रत्येक रविवारी हे चालू. त्यांच्या पत्नीमुळे हे कोडे नंतर उलगडले. डॉक्टर हे तसे मोठ्या घरचे, वडीलसुद्धा मोठे शिकलेले वगैरे पण घर मात्र गावात. डॉक्टरांना एक लहान भाऊ. एकदा दोघे खेळत असताना लहानगा पडला खाटेवरून. आणि त्याचे डोके आपटले. वडील घरी नव्हते. खेडेगावातून शहरात हॉस्पिटलला नेईपर्यंत उशीर झाला. भाऊ वाचला खरा पण मतिमंद राहिला. त्याच वेळी नारायण यांनी प्रतिज्ञा केली डॉक्टर व्हायची आणि गावात राहून प्रॅक्टिस करण्याची. त्यांचे वडील नक्कीच त्यांना स्वत:चे क्लिनिक उभे करून देऊ शकले असते. पण नारायण जोशी हट्टाने डॉक्टर झाल्यावर गावात आले. सरकारी नोकरी पत्करली त्यांनी. आपला निश्चय पूर्ण केला त्यांनी. आईवडील म्हातारे झाल्यावर त्यांनी आपल्या भावाला पणजीला असायलममध्ये ठेवले होते. दर रविवारी ते तिथे जात. दिवसभर त्यांच्या बरोबर घालवून मग संध्याकाळी परत येत.
गावात जवळजवळ पाच वर्षे होते डॉक्टर. नंतर ट्रान्स्फर झाली त्यांची. ज्या डॉक्टरांचे सामान साध्या बसवरून आले होते, त्यांना निरोप द्यायला सगळे गावकरी जमले होते आरोग्य केंद्रात. कधी कोणाला छदाम न देणाऱ्या मोगराने प्रेमाने डॉक्टरांच्या हातात कडे चढवले सोन्याचे. डॉक्टर घेत नव्हते पण बहिणीची भेट म्हणून ठेव असे मोगराने म्हणताच डॉक्टरही गहिवरले. हल्ली दोन वर्षापूर्वी डॉक्टर गेले. वय वर्षे ऐशी होते. सुखात गेले. अहो सुखातच जाणार, सगळ्यांचे भले केले होते त्या माणसाने. चित्रगुप्त तरी काय हिशेब ठेवणार?आज मुलगा अजिंक्य ही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून डॉक्टर झालाय. परवाच भेटला होता सरकारी इस्पितळात. डिन झालाय आता. क्षणभर डॉक्टरांचाच भास झाला त्याला बघून. तीच लहानखुरी चण आणि तीच डोळे बंद करून बोलण्याची स्टाइल...
- रेशम जयंत झारापकर, मडगाव