श्लोक ते मेडिटेशन : मनाच्या वाटेवरचा आधुनिक प्रवास

आपली पिढी ‘पॉडकास्ट’ ऐकते, आधीची ‘रामायण’. एक meditation music लावतो, दुसरा शांत बसून रामरक्षा म्हणतो. पद्धती वेगळ्या असू शकतात पण गरज एकच आहे, मनाचं समाधान.

Story: मनी मानसी |
19th April, 05:53 pm
श्लोक ते मेडिटेशन : मनाच्या वाटेवरचा आधुनिक प्रवास

“माझं काही बिघडलं नाहीये, मी का जावं मानसोपचारतज्ज्ञाकडे?”

“अरे, ती सायकोलाॅजी म्हणजे सायको लोकांसाठी असते.”

“हे मेडिटेशन म्हणजे निव्वळ फॅड आहे”

माझ्या समुपदेशन कक्षात बसलेली अनेक णसं जेव्हा हे असं काहीसं म्हणतात, तेव्हा मी एक क्षणभर विचार करते, खरेच मनाची ही संकल्पना फक्त आजच्या माॅर्डन युगातील आहे का?

मन दिसत नाही म्हणून काय झालं? आपल्या भावना, राग, लोभ, मत्सर, माया, प्रेम, द्वेष हे काही चित्रपटातील गाण्यात सांगितल्याप्रमाणे आपल्या हृदयातून येत नाहीत बरं का! हे सगळं मन नावाच्या अदृश्य पण ठोस अस्तित्वातूनच उगम पावलेलं असतं. आता ते नक्की काय, कसं, हे समजणं कठीणच, पण म्हणून ‘मन’ हा काही अदृश्य, उपेक्षणीय किंवा ‘ह्याचं काय घेऊन बसलात?’ म्हणण्यासारखा विषय नक्कीच नाही हं.

‘सायन्स’ की ‘सांस्कृतिक गुंतागुंत’?

आजही मानसशास्त्र, मानसोपचार ह्याबाबत काहीशी गोंधळलेंली धारणा आपल्या समाजात आहे. कोणी म्हणतात, “हे सगळं अमेरिकन लोकांनी चालवलेलं आहे.” तर कोणी म्हणतात, “आमच्या काळात असं काही नव्हतं, तरी आम्ही आनंदी होतोच की!” अर्थात, अशा समजुतींचं मूळ एकाच ठिकाणी आहे ते म्हणजे आपल्या परंपरेची आणि विज्ञानाची पडलेली फूट. 

खरं सांगायचं तर, मानसशास्त्र हे केवळ पाश्चिमात्य विद्येचं उत्पादन नाही. जगाच्या कित्येक कोपऱ्यांत, विविध परंपरांमध्ये, ‘मन’ ह्या घटकावर विचार केला गेला आहे. तसेच, आपली संस्कृती, आपले संत, आपल्या परंपरा, हे काही आताच्यासारखे युट्युबवरचे मॉडर्न life coaches नव्हते. तरीही आजही रिलेटेबल आहेतच ना! 

अहो, आपल्याकडे तर ज्ञानेश्वरी आहे! संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अध्यात्मात मानसशास्त्राची अचूक बीजं रोवली होती, आणि ती इतकी खोलवर होती की, आजच्या थेरप्युटिक मॉडेल्सनाही त्याचा संदर्भ घ्यायला लागतो. 

“मना सज्जन भावे, संपूर्ण नेमाने | परीक्षी काय दुजे ज्ञान?” (ज्ञानेश्वरी, अध्याय ७)

हा केवळ आध्यात्मिक संदेश नाही, ह्याचा मानसशास्त्रीय अर्थ खोल आहे. श्लोकात म्हटल्याप्रमाणे ‘मना सज्जन’ म्हणजे काय? अर्थातच, आपल्या मनाचं सजग आणि सज्जन होणं. अहो, हेच तर मानसोपचाराचं प्राथमिक ध्येय आहे, नाही का? 

बालोपासना आणि श्लोक – लहानग्यांच्या मेडिटेशनची पहिली भेट

आजकाल आपल्याला वाटतं की ध्यान, मेडिटेशन, योग हे नवीन पाश्चिमात्य ट्रेंड्स आहेत. पण बघा ना, आपल्या घरात अजूनही सायंकाळच्या प्रार्थनेत “शुभं करोति कल्याणम्...” चा स्वर ऐकू येतो. बालोपासनेच्या माध्यमातून, मन शांत करण्याची, एका ठराविक विचारसरणीकडे वळवण्याची जी प्रक्रिया असते तीच तर मेडिटेशनचं बीज आहे!कलावतीदेवी यांच्या बालोपासना या पुस्तकात एक अतिशय सुंदर आणि अर्थवाही प्रार्थना आहे:

हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !

माझ्या मनाची चंचलता दूर कर |

तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे |

माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे |

समदृष्टी आणि अढळ शांति मला दे ||

ही प्रार्थना केवळ शब्दांचा गोडवा नाही, तर मनाच्या प्राथमिक प्रशिक्षणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, या श्लोकांमध्ये intrinsic motivation, purpose-oriented behavior आणि emotional regulation या संकल्पनांचा उल्लेख आहे. लहान वयात मनात उदात्त भावना रुजवण्याचे काम या ओळी करतात आणि हीच तर थेरपीची पहिली पायरी आहे.

आजचा मानसोपचार आणि परंपरेचा सेतू

एका सेशन सत्रात एक तरुणी माझ्याकडे आली होती. ती म्हणाली, “मला अगदी रोज anxiety फिल होत राहते. मन फारच अस्थिर असतं हो”

मी विचारलं, “तुला कुठल्या गोष्टीने तुझ्या विचारांमध्ये सर्वात जास्त स्थैर्य जाणवते?”

ती म्हणाली, “मी दररोज सायंकाळी आजीबरोबर ‘रामरक्षा’ म्हणते तेव्हा थोडं बरं वाटतं.”

मग काय, तिच्या थेरपीचा एक भाग आम्ही रामरक्षेचं स्वानुभूतीतून चिंतन आणि त्या संदर्भांवरून समुपदेशन असा ठेवला! का? 

कारण, ते शब्द, त्यातली नादप्रतिध्वनी, त्यातून येणारी मानसिक शांतता, ह्या सगळ्याचं मानसशास्त्रात “Mindfulness-based Cognitive Therapy” नावाचं मॉडेल आहे! म्हणजे एकूण काय, तर आपल्या परंपरेतील साधनं आजच्या मानसशास्त्राच्या व्यासपीठावर ठाम उभी आहेत.

परंपरा विरुद्ध विज्ञान – की परंपरेतील मनोविज्ञान?

खरंतर, आपण परंपरेकडे संभ्रमाने पाहतो, आणि विज्ञानाला परंपरेपासून दूर ठेवतो परंतु हा सगळा एक दुर्दैवी गैरसमज आहे. वास्तविक, मानसशास्त्र आणि आपल्या अध्यात्माचा मेळ हा ‘विरोधाभास’ नाही, तर एक विलक्षण ‘संगम’ आहे. ज्यास आता आपण spirituality म्हणतो!

कसं आहे पहा, आपली पिढी ‘पॉडकास्ट’ ऐकते, आधीची ‘रामायण’. एक meditation music लावतो, दुसरा शांत बसून रामरक्षा म्हणतो. पद्धती वेगळ्या असू शकतात पण गरज एकच आहे, मनाचं समाधान. आणि म्हणूनच, बालोपासना, श्लोक, मेडिटेशन – हे सगळं ‘अंधश्रद्धा’ नव्हे, तर ‘अंतरश्रद्धा’ आहे.

कोणीतरी फारच सुरेखरित्या म्हटले आहे, “मनाला जर तुम्ही ऐकलं नाही, तर ते आरडाओरडा करतं. परंतु त्यास ऐकलं, तर ते कुजबुजतं आणि मग गाणं होतं.”

मग सांगा बघू, आज तुमचं मन काय म्हणतंय? एकदा ऐकून तर पाहा.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४