तिसवाडी : खोर्लीत जुने गोवे पोलिसांची छापेमारी; २ किलो गांजा जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
तिसवाडी : खोर्लीत जुने गोवे पोलिसांची छापेमारी; २ किलो गांजा जप्त

म्हापसा : तिसवाडीतील मोलार, खोर्ली येथे जुने गोवे पोलिसांनी छापा टाकून २ लाख ३५ हजारांचा २ किलो ३५ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी नीरजकुमार अरूणकुमार सिंग (३८, रा. माशेल व मूळ हसपुरा बिहार) आणि उपेंद्र धुपसागर राम (४०, रा. आमोणा-डिचोली व मूळ जलापूर-बिहार) या दोघांना अटक केली.

 शुक्रवारी २५  रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई  केली. मोलार येथील रेल्वे पुलाजवळ ड्रग्सची तस्करी होणार असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांना गोपनीय  सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश भंडारी व दिप्तराज गावडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

संशयित आरोपी घटनास्थळी येताच पोलीस पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले. झडतीवेळी संशयित नीरजकुमार सिंग याच्याकडे १.२० किलो गांजा तर संशयित उपेंद्र राम याच्याजवळ १.१५  किलो गांजा सापडला. या २ किलो ३५ ग्रॅम गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २ लाख ३५ हजार रूपये आहे. हा गांजा जप्त करून दोन्ही संशयितांना पोलिसांनी ड्रग्स प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 


हेही वाचा