स्वप्नपूर्ती

जीवनाच्या ध्येयपूर्तीकडे जाणारी रामजीसारखी माणसे आज चुकून सापडतात. स्वप्नपूर्ती करायला कष्ट, जिद्द, सहनशीलता याची नितांत गरज असते हे रामजीने जगाला पटवून दिली होते. एक शिक्षिका म्हणून त्याची ती स्वप्नपूर्ती पाहून मीही समाधानी झाले.

Story: ​तिची कथा |
19th April, 05:59 pm
स्वप्नपूर्ती

माझ्या आठवड्यातील ठरलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक रविवारी मासळी बाजारात चक्कर मारणे. रविवार आला की, दुपारच्या जेवणासाठी ताजी मासळी लागतेच. मी आणि माझे पती नेहमीप्रमाणे मासळीचे भाव विचारत बाजारात फिरत होतो. अचानक... कोणीतरी मला "टीचर" म्हणून हाक मारली. मी मागे वळून पाहिले, तर एक रुबाबदार, धिप्पाड पण सावळ्या रंगाचा, हसमुख आणि गोल चेहऱ्याचा तरुण, लिंबू रंगाचा शर्ट परिधान करून आदराने माझ्याकडे हसून पाहत होता. मीही हसले आणि त्याला निरखून पाहिले. 

तितक्यात तो म्हणाला, "काय टीचर, आपण मला ओळखले नाही? मी रामा पुरंदरकर, तुमच्या शाळेचा विद्यार्थी." त्याचे ‘रामा पुरंदरकर’ हे नाव ऐकताच माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. "अरे रामा! ओळखले, ओळखले तुला... मी तुला कशी विसरेन? तू तर माझा खूप लाडका विद्यार्थी होतास," मी उद्गारले. "मी ठीक आहे टीचर, पण तुम्ही खूप बारीक आणि अशक्त दिसत आहात. तुमची तब्येत ठीक आहे ना...?" रामजीने मला मध्येच थांबवत विचारले..  त्याच्याबद्दल विचारताच त्याने आनंदाने उत्तर दिले, "होय टीचर, आपल्या आणि देवाच्या कृपेने मी व्यवस्थित सेटल झालो आहे." मग त्याने अभिमानाने सांगायला सुरुवात केली, "माझ्याकडे चार ट्रक आहेत, दोन खडी क्रशर आहेत आणि मी सेंट्रिंगचे सामान भाड्याने देतो. मी खडी आणि रेतीचा पुरवठा करतो." 

मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. मनात विचारले, "याची तर लाखोंची उलाढाल असेल." तो पुढे बोलला, "आणि मी आमच्या वॉर्डचा पंच आहे, आणि माझी पत्नीसुद्धा शेजारच्या महिलांसाठी राखीव वॉर्डची पंच आहे." त्यावर मी आनंदाने म्हटले, "अरे व्वा! खूप छान!" तो पुढे बोलू लागला, "टीचर, माझ्या निलूचे (बहिणीचे) लग्न झाले. मी एक सुंदर बंगला बांधला आहे, जिथे मी माझ्या आईसोबत राहतोय." तो बोलत होता आणि मी त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होते. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने मला त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि माझा मोबाईल नंबर घेतला. एवढेच नव्हे, तर आम्ही ज्या मासळी विकणाऱ्या बाईजवळ माशांच्या भावासाठी बोलणी करत होतो, तिच्याकडून त्याने आमच्यासाठी बांगडे, कोळंबी आणि सुरमई असे मिळून दोन हजार रुपयांची मासळी विकत घेतली आणि तो पटकन निघून गेला.

माझे पती माझ्यावर रागावले, "त्याने फुकटात दिलेले मासे आपण घेतलेच कसे?" त्यांच्या रागाण्यावर मी गप्प बसले आणि भूतकाळात रमून गेले. वीस वर्षांपूर्वी मला एका हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. कामगार वस्तीतल्या त्या शाळेत शिकवण्याची संधी मला मिळाली होती. मला लहानपणापासूनच शिक्षिका व्हायची खूप आवड होती, त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असं मी ठरवलं होतं. 

पहिल्या दिवशी नवीन शिक्षिका म्हणून मुलांनी थोडा गोंधळ घातला, पण हळूहळू मी मुलांना आवडू लागले. बहुतेक मुले खूप मस्तीखोर होती. त्यात रामजी नावाचा एक मुलगा नववीत नापास झालेला, पण शांत स्वभावाचा, नेहमी मागच्या बाकावर बसणारा, सगळ्यांपासून वेगळा आणि आपल्याच विचारात हरवलेला असायचा. मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. 

एके दिवशी मी मुलांना गृहपाठ दिला, ज्याच्या आधारावर त्यांच्या प्रगतीपुस्तकात गुण मिळणार होते. काही मुलांनी चांगले निबंध लिहिले, तर काहींनी एकमेकांचे कॉपी केले. सगळ्या मुलांनी वेळेत निबंध जमा केले, पण त्या सगळ्यांमध्ये रामजीचा निबंध वेगळा होता. अगदी साध्या, सोप्या भाषेत त्याने "माझे स्वप्न" या विषयावर आपले विचार मांडले होते. त्याला स्वतःचे एक घर बांधायचे होते, ज्यात गॅसचा आणि इंडक्शनचा चुल्हा असेल, ज्यामुळे त्याच्या आईला चूल फुंकावी लागणार नाही आणि तिच्या डोळ्यात धूर जाणार नाही. 

त्याच्या स्वप्नातल्या घरात चोवीस तास पाणीपुरवठा असणार होता, ज्यामुळे पाणी भरून सार्वजनिक शौचालयाला जाताना रांगेत उभे राहावे लागणार नव्हते. त्याच्या घरात प्रत्येकाला स्वतंत्र खोली असणार होती आणि घराभोवती सुंदर, बारा महिने फुलांनी बहरलेली बाग असणार होती. नवीन घरात गेल्यावर त्याला त्याच्या आईला रोज मंदिरात फुले विकायला पाठवायचे नव्हते. मला त्याचा निबंध खूप आवडला होता.

मी जेव्हा त्याच्या आईशी बोलले, तेव्हा मला समजले की रामजी लहान असतानाच त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि दोन मुलांची जबाबदारी त्याच्या आईवर टाकली. रामजीची आई मंदिराबाहेर फुले विकून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवत होती आणि रामजी पहाटे उठून वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करत होता. एक शिक्षिका म्हणून मी त्याला खूप समजावले. त्याच्या मेहनती आणि जिद्दीच्या बळावर तो बारावीत चांगल्या गुणांनी पास झाला, पण त्यानंतर आमचा संपर्क तुटला. 

तब्बल पंधरा वर्षांनी तो मला मासळी बाजारात भेटला. त्याच्या आदराला मान देऊन आम्ही त्याच्या घरी गेलो. त्याने त्याच्या बहिणीचेही लग्न लावून दिले होते, जी सहकारी खात्यात नोकरी करत होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्याच्यातील विनम्रतेमुळे तो निवडणुकीत उभा राहिला आणि जिंकलासुद्धा. तो जास्त शिकलेला नव्हता, पण त्याला माणसे ओळखण्याची कला चांगली अवगत होती. त्याच्या छोट्याशा बंगल्यात त्याची आई आता आरामात राहत होती आणि तिला मंदिराजवळ फुले विकायला बसावे लागत नव्हते. ती त्याच्याच बागेतील फुले देवाला अर्पण करण्याचे पुण्यकर्म करत होती. 

रामजीची पत्नीसुद्धा महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून पंच म्हणून मोठ्या मतांनी निवडून आली होती. आजकाल रामजीसारखी माणसे क्वचितच भेटतात. ज्यांनी आपल्याला मदत केली, अडचणीच्या वेळी आधार दिला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारी आणि आपल्या ध्येयाकडे मायेच्या ओलाव्याने जाणारी रामजीसारखी माणसे आजकाल शोधूनही सापडत नाहीत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट, जिद्द आणि सहनशीलता किती आवश्यक आहे, हे रामजीने जगाला दाखवून दिले होते. एक शिक्षिका म्हणून त्याची स्वप्नपूर्ती पाहून मला खूप समाधान वाटले.



-  शर्मिला प्रभू
आगाळी, फातोर्डा-मडगांव