गर्भनिरोधक गोळ्या ही गर्भधारणेपासून बचावासाठी एक प्रभावी आणि सोपी पद्धत आहे, पण या गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतल्यास किंवा दीर्घकाळ वापरल्यास महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
गर्भधारणा ही एक अत्यंत संवेदनशील प्रक्रिया असून आधीच्या काळापेक्षा सध्याच्या काळात यावर नियंत्रण ठेवणे हे अनेक महिलांसाठी आवश्यक बनले आहे. यासाठी विविध गर्भनिरोधक उपाय उपलब्ध असले तरी, नको असलेल्या गर्भधारणेपासून वाचण्यासाठी सोपा व प्रभावी पर्याय असल्याने गर्भनिरोधक गोळ्या वापरणे ही स्त्रियांसाठी सध्या एक सामान्य बाब बनली आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या या गोळ्यांचा वापर योग्य प्रकारे केल्याने अनावश्यक गर्भधारणा टाळता येते, तसेच काही आरोग्यविषयक फायदेही मिळू शकतात. पण त्याचे सतत सेवन केल्याने महिलांच्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो हे आपण आज समजून घेऊ..
गर्भनिरोधक गोळ्या कशा
काम करतात?
गर्भनिरोधक गोळ्या हा एक गर्भनिरोधकाचा प्रकार आहे, जो दररोज सातत्याने घेतल्यास गर्भधारणा रोखण्यासाठी ९९% प्रभावी ठरू शकतो. या गोळ्यांमध्ये हार्मोन्स असतात, जे मासिक पाळीचे नियमन करतात, पीएमएस लक्षणे कमी करतात, अंडाशय आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात, त्वचा सुधारतात आणि एंडोमेट्रिओसिसवर उपचार करतात.
सामान्यपणे गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकिट हे २८ दिवसांचे असते. २१ गोळ्या हार्मोन्सयुक्त असतात, तर बाकीच्या ७ गोळ्या ‘ब्लँक’ असतात, ज्या दिवसांत पाळी येते. गोळ्या दररोज एक ठराविक वेळेला घ्याव्या लागतात व यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात:
संयुक्त गोळ्या : यामध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन हार्मोन्स असतात.
फक्त प्रोजेस्टिनयुक्त गोळ्या : यामध्ये फक्त प्रोजेस्टेरोन हार्मोन असते. हे स्तनपान करत असलेल्या महिलांसाठी सुरक्षित असतात.
गर्भनिरोधक गोळ्या अनावश्यक गर्भधारणा टाळणे, पाळी नियमित ठेवणे, पाळीतील वेदना किंवा त्रास कमी करणे, त्वचाविकार कमी करणे, पीसीओएस किंवा एंडोमेट्रायोसिससारख्या त्रासांवर नियंत्रण ठेवणे हे काम करतात. पण यांचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. गोळी दररोज ठराविक वेळेसच घ्यावी. एकही गोळी चुकल्यास डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय दुसऱ्या दिवशी दोन गोळ्या घेण्याचा मोह टाळावा. उलटी, अतिसार झाल्यास गोळीचा प्रभाव कमी होऊ शकतो. गोळ्या सुरुवात करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापराने कोणते दुष्परिणाम दिसून येऊ शकतात?
हार्मोनल बदल व त्याचे परिणाम :
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्स शरीरातील नैसर्गिक चक्रांमध्ये हस्तक्षेप करतात. यामुळे डोकेदुखी, मळमळ, थकवा व चिडचिड यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. मूड स्विंग्स आणि कधी कधी नैराश्याची लक्षणे दिसू शकतात. काही स्त्रियांमध्ये हार्मोन्समुळे त्वचेवर मुरूम किंवा केसगळती वाढू शकते.
पचनसंस्थेवर परिणाम:
गोळ्या घेतल्यानंतर काहींना अजीर्ण, मळमळ, गॅसेस होण्याची समस्या सतावू शकते. काही वेळा भूक वाढणे किंवा अगदीच भूक मंदावणे अशा तक्रारी येऊ शकतात.
वजन वाढ:
हार्मोनल गोळ्यांमुळे शरीरातील वाॅटर रिटेंशन वाढते आणि त्यामुळे वजन वाढू शकते.
रक्तस्रावाशी संबंधित समस्या:
पाळीमध्ये अनियमितता, मध्येच रक्तस्राव किंवा पाळी थांबणे असे प्रकार होऊ शकतात. काही महिलांमध्ये रक्तस्त्राव अधिक दिवस चालतो, तर काहींना पाळी अगदीच कमी होते.
आरोग्याचे गंभीर धोके: काही महिलांमध्ये या गोळ्यांमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो, जो फुफ्फुस, पाय किंवा मेंदूत पोहचून घातक ठरू शकतो. हृदयविकार, स्ट्रोक, किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता धूम्रपान करणाऱ्या किंवा ३५ वर्षांवरील महिलांमध्ये वाढते. तसेच यकृतावर ताण येण्याची शक्यता असते.
प्रजनन क्षमतेवर परिणाम:
बहुतेक वेळा गोळ्या बंद केल्यावर मासिक पाळी पूर्ववत होते. पण काही महिलांमध्ये नैसर्गिक पाळी येण्यास काही महिने लागू शकतात. यामुळे काही जणींना प्रजनन क्षमतेसंबंधी चिंता वाटू लागते.
मानसिक आरोग्यावर परिणाम:
काही संशोधनानुसार दीर्घकाळासाठी गोळ्या घेतल्याने मानसिक तणाव, चिडचिड, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या वाढू शकतात. तर काही महिलांना गोळ्या घेतल्यानंतर मानसिक स्थैर्यही मिळते.
गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर होत असल्यास किंवा दुष्परिणाम दिसून येत असल्यास कंडोम, आययूडी जसे कोपर-टी, मिरेना, गर्भनिरोधक इंजेक्शन्स, ओव्युलेशन ट्रेकींगसारख्या नैसर्गिक पद्धती यांचा पर्यायी वापर करावा.
लक्षात असू द्या की, गर्भनिरोधक गोळ्या ही गर्भधारणेपासून बचावासाठी एक प्रभावी आणि सोपी पद्धत आहे, पण या गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतल्यास किंवा दीर्घकाळ वापरल्यास महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर