मडगाव : दक्षिण गोव्यातील पोलिसांनी गोव्यात अवैधरित्या वास्तव्यास राहणार्यांची पडताळणी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मडगावात मालभाट परिसरातील झोपडपट्टीत पोलिसांनी पाहणी केली असता येथे बेकायदेशीररीत्या झोपड्या उभारुन भाडेकरु राहत असल्याचे दिसून आले. आरोग्य खात्यासह वीज खात्याच्या अधिकार्यांनीही यावेळी पाहणी केली. मडगाव पोलिसांनी प्रशासनाकडे सदर बेकायदेशीर झोपडपट्टी पाडण्याची मागणी केली आहे.
मडगाव येथील मालभाट परिसरात मडगाव पोलिसांकडून भाडेकरुंची पडताळणी मोहीम राबवली. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस खात्याकडून मिळालेल्या सूचनांच्या अनुषंगाने दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत राहणाऱ्या भाडेकरुंच्या पडताळणी मोहिमेला सुरुवात केलेली आहे. यानुसार अशा ठिकाणी बेकायदेशीररीत्या कुणी राहत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान भाडेकरु पडताळणीसाठी आलो असता भाड्याने राहिलेल्या काही लोकांनी अर्ज भरले असले तरीही त्या व्यक्ती कामाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमदर्शी पाहिल्यास ही झोपडपट्टी बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. जागेच्या मालकाने ही तात्पुरती झोपडपट्टी तयार करुन वीज व पाणी जोडणी दिलेली आहे, अशी माहिती मालभाट मडगाव येथील पडताळणी मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक सामंत यांनी दिली.
दरम्यान यावेळी आरोग्य खात्याचे अधिकारी, वीज खात्याचे अधिकार्यांसह पालिका निरीक्षकांनाही बोलावण्यात आले. वीज खात्याच्या कर्मचार्यांनी सर्व परिस्थिती पाहून सध्या वीज जोडणी बंद केलेली आहे. पाणी जोडणीची तपासणी सुरु असून तीही तोडण्यात येतील. जागा मालकालाही सदर भाडेकरुंना जागा खाली करण्यास सांगावे अशी सूचना केली आहे. याशिवाय उच्च न्यायालयाकडून बेकायदा बांधकामे पाडण्याचे निर्देश पालिका व पंचायतींना दिलेले आहेत. त्यानुसार लवकरच पालिका अहवाल सादर करेल. या वस्तीतील लोक रात्रीच्यावेळेला रस्त्यावरील लोकांना त्रास देतात. भागात चोऱ्यामाऱ्या व इतर गैरप्रकार वाढलेले आहेत. याची जबाबदारी कुणीही घेत नाही. त्यामुळे याठिकाणी कोण राहतात हेही समजत नसल्याने पालिका प्रशासनाद्वारे ही बांधकामे पाडण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक सामंत यांनी केली आहे.