काटा रुते कुणाला!

पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी भीमपलास रागात आपल्या स्वरांनी अभिषेक करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या गाण्याची मोहिनी अशी काही रसिकांच्या मनावर पडली. की आजही हे गाणे ऐकताना अभिषेकी बुवांनी घेतलेल्या तानांवर आपल्या माना आपसूकच डोलायला लागतात.

Story: शब्दगीते |
19th April, 05:49 pm
काटा रुते कुणाला!

काट्यांनीच जखमा दिल्यावर गुलाबही रक्ताळून जातो. आणि मग हे दुःख तो कोणापाशी व्यक्त करणार? आपलीच माणसे जेव्हा जखमा देतात, तेव्हा होणाऱ्या वेदनेचा दाह हा भयानक असतो. त्या झालेल्या जखमा उरात लपवून हसऱ्या चेहऱ्याने या जीवनाच्या रंगमंचावर वावरावे लागते. मनाच्या अंतरंगात जरी वेदनांचा, दुःखाचा आगडोंब उसळलेला असला, तरी त्याचा दाहक दाह सोसत जीवनाची मार्गक्रमणा करावी लागते... आणि हेच नेमके कवयित्री शांता शेळके यांनी बरोबर हेरून या भावनातीत शब्दांना एकत्रित बांधून ‘काटा रुते कुणाला...’ या गीतात एकत्रित केले आणि एका अजरामर गीताचा जन्म झाला.

स्त्रीत्वाच्या जाणिवा जपताना त्या भावनांना शांता शेळके यांनी आपल्या गीतांच्या शब्दांत नेहमीच प्राधान्य दिले. ‘काटा रुते कुणाला’ हे त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट गीत. या गीताला नाटककार रणजित देसाई यांच्या ‘हे बंध रेशमाचे’ या संगीत नाटकात स्वरांचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी भीमपलास रागात आपल्या स्वरांनी अभिषेक करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या गाण्याची मोहिनी अशी काही रसिकांच्या मनावर पडली की आजही हे गाणे ऐकताना अभिषेकी बुवांनी घेतलेल्या तानांवर आपल्या माना आपसूकच डोलायला लागतात.

काटा रुते कोणाला... आक्रंदात कोणी

मज फूल ही रुतावे.. हा दैवयोग आहे |

सांगू कशी कुणाला.. कळ आतल्या जीवाची

चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे |

या गीतांच्या शब्दांत स्त्रीच्या उरातील दबलेल्या वेदना व्यक्त करताना शांता शेळके यांनी मोजक्या शब्दांत वेदनेचा मोठा अर्थ सांगितला आहे. जेव्हा नियतीपुढे हात टेकले जातात, तेव्हा मनात निराशा पसरते. आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून मिळालेले दुःख, वेदना या इतक्या त्रासदायक असतात, की त्या धड कोणाकडे उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे ही वेदनेची आग आतल्या आत धुमसत राहते. आणि अशा वेळी मनाची जी घुसमट होते, त्याने शरीर आतल्या आत हळूहळू जळत राहते. वेदनेला त्यांनी काट्याची उपमा दिली आहे. काट्याचे टोक जसे अणकुचिदार असते, तसेच वेदनेचे टोकही अणकुचिदार असते. त्यामुळे काटा जसा सहज रुतून बसतो, तशीच वेदना ही मनात सहज रुतून बसते. जेव्हा या वेदनेचा चिरदाह मनात भळभळतो, तेव्हा मनात निराशा थैमान घालते आणि मग मन हे अगदी नाजूक होऊन जाते. इतके की त्याला फुलाचा जरी स्पर्श झाला, तरी तो स्पर्श नसून वेदना रुतत आहे, असे वाटायला लागते. वेदनेच्या चक्रव्यूहात एकदा अडकलो की त्यातून बाहेर येणे कठीणच... अशा वेळी समोर आलेल्या उत्कर्षाच्या संधीही हातातून निसटून जातात.

आकाशातील नक्षत्रांनी चाल बदलल्यावर जशी भूतलावर हलचल निर्माण होते आणि जेव्हा वेदना रुतते, तेव्हा तशीच हलचल मनात उत्पन्न होते आणि मग उद्विग्नता भरून राहते. मनात निराशा दाटून राहिल्यावर मग या दुष्टचक्रात मन भटकत राहते.

काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे

माझे अबोलणे ही विपरीत होत आहे!

आशा जिथे संपतात तेव्हा सर्व काही भकास वाटू लागते आणि सर्व काही विपरीत होऊ लागते. ज्याची कल्पनाही नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. आपण काहीही बोललो तरी त्याचा विपरीत अर्थ काढला जातो आणि जे कधीच बोललो नाही किंवा व्यक्त झालो नाही, त्याचाही उलट अर्थ काढला जातो आणि मन हे दुष्ट चक्रात फिरत राहते. आजूबाजूला काय घडत आहे किंवा कसल्या गोष्टी घडत आहेत, 

याची कल्पना येत नाही. मन कायम संभ्रमावस्थेत राहते आणि या दोलायमान अवस्थेत 

मनाची स्थिती अगदी विचित्र होऊन जाते.

मनाची ही अवस्था असताना जेव्हा सर्व काही विपरीत होत राहते, तेव्हा हा दैवयोग आहे का असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडून अपेक्षाही नव्हती, अशांकडून वेदनांचा भडिमार होत राहतो आणि मन पार कोलमडून जाते. ज्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, आपले अवघे आयुष्य ज्यांच्यासाठी वेचले, त्यांच्याकडूनच जर अशी वागणूक मिळाली, तर मग कोणासाठी जगायचे हा प्रश्न निर्माण होतो आणि मग शांताताई आपल्या शेवटच्या कडव्यात म्हणतात...

हा स्नेह, वंचना की काहीच आकळेना

आयुष्य ओघळूनी मी रिक्त हस्त आहे!...


कविता आमोणकर