एखाद्याच्या कपाळावर जेव्हा टिळा पाहतो तेव्हा त्या व्यक्तिविषयी मनात जे चित्र उभे राहते ते सात्विकतेचं, त्याच्या साधुत्वाचं दर्शन घडवणारं असतं.
शक्यतो आपण असं मानतो की जो माणूस देव मानणारा, भोळा भाबडा, भक्त या श्रेणीतला असतो तोच कपाळी टिळा लावून घेतो. टिळा किंवा तिलक ही धार्मिक संस्कृतीतली एक खूण आहे. जी सामान्यत: कपाळावर लावली जाते. हिंदू धर्मात ही एक जुनी परंपरा आहे राजे युद्धाला निघाले की सुवासिनी त्यांचे औक्षण करून त्यांच्या कपाळावर तिलक रेखित असत. त्यामागे तुम्ही विजय मिळवून परत या असा संदेश असे. विजयी होऊन परतल्यावर सुद्धा असेच औक्षण करून तिलक रेखाटला जाई ही गोष्ट निष्ठापूर्वक आजही पाळली जाते. सनातन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. टिळा लावल्याने व्यक्तिमत्त्वात सात्त्विकता दिसून येते एवढेच नाही तर त्या व्यक्तिच्या वागण्यात सकारात्मकता येते असे मानले जाते. अशी व्यक्ति कोणतेही कुकर्म करताना दहादा विचार करेल. टिळा लावण्याने शांती आणि ऊर्जा मिळते ती ऊर्जा युद्धावर जाणाऱ्या वीरांना गरजेची असते. देवाचा आपल्याला या तिलकाद्वारे आशीर्वाद प्राप्त झाला आहे अशी भावना मनात तेवत राहते. दु:खाच्या भावना लुप्त होतात, आपल्या कार्यात आपल्याला यश मिळणारच ही मनाची सकारात्मकता विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरते. जे लोक पत्रिका कुंडली यावर अधिक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तिलक लावल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो असे मान्य करतात.
तिलक लावण्याचे प्रकार अनेक आहेत आणि तो तिलक कशाने लावतात ह्याचे ही अनेक प्रकार पहावयास मिळतात. बायका कपाळावर हळदी कुंकू लावतात; देवाला चंदन, अष्टगंध, भस्म, गुलाल, सिंदूर रोळी वापरतात. तिलक लावतानाचेही नियम असतात स्वत:ला तिलक लावताना अनामिका बोटाचा वापर करतात तर दुसऱ्याचा तिलक रेखतात तेव्हा अंगठ्याचा वापर करतात. काही लोकांच्या मते आपल्या शरीरात सात चक्रे असतात त्यापैकी एक कपाळाच्या मधोमध असते त्यावर तिलक लावला की ते सक्रिय होऊन त्याचा फायदा शरीराला होतो. आज्ञा चक्र जागृत होऊन शक्ती ऊर्ध्वगामी होते. त्यामुळे शरीरात जोम आणि चेहऱ्यावर तेज वाढते. कोणताही सण असो की घरात पूजाअर्चा असो धार्मिक कार्य कपाळावर टिळा लावून सुरू करायची प्रथा आहे. शास्त्रात सांगितले आहे की चंदनाचा टिळा लावल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. संत महात्म्यांच्या कपाळी आपण नेहमीच टिळा पाहतो. सर्वसाधारण माणसे रोज रोज नाही लावत पण काही विशेष समारंभात लावतात. तिलक लावल्यावर शुभ आणि पवित्र लहरी मनात निर्माण होतात. त्यामुळे मनात मंगलता भरून राहते. गावाकडे लग्नाची बोलणी झाली की टिळा लावणं हा छोटासा समारंभ असतो. आज मुलीचा टिळा झाला म्हणजे लग्न फिक्स झालं असं सांगायची रीत आहे. प्रत्यक्षातही तसा टिळा लावून त्यावर रुपयाचे कॉईन लावायची पद्धत आहे.
आपलं दैनंदिन वर्तन कसं असलं पाहिजे याबाबत हिंदू धर्मात, पुराणात काही गोष्टी सांगितल्या आहेत. देवदर्शनाला जाताना पूर्ण कपडे घालावेत, पाया पडताना डोके झाकून घ्यावे म्हणजे डोक्यावर पदर घ्यावा, टोपी घालावी, घरी आलेल्या सुवासिनीला हळदी कुंकू लावावे. आंघोळ केल्यानंतर कपाळावर टिळा लावावा. ज्योतिष शास्त्रानुसार टिळा लावणे हे भगवान विष्णुचे तेज मानले जाते. विष्णु भक्त उभा तिलक रेखतात तर शिवभक्त आडवा तिलक रेखतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते श्री कृष्ण भक्त U आकाराचा तिलक लावतात. काही देवीच्या भक्ती करणाऱ्या जोगतिणी कपाळभर कुंकवाचा मळवट भरतात. काही जमातीत आडवी कुंकवाची चिरी कपाळावर काढली जाते. धनगर मराठा समाजात तशी पद्धत आहे. ब्राह्मणांमध्ये काही समाजात चंद्रकोर रेखाटली जाते. कुणी लंबगोल, कुणी चौकोनी, कुणी नुसती उभी रेघ, आडवी रेघ, कुणी रंगीत खडे जडवलेली मोती, जडवलेली टिकली लावतात. तर बऱ्याचशा बायका गोल कुंकू भाळी रेखाटतात. कुणाची गोल टिकली खूप मोठी असते तर कुणाची मध्यम, तर कुणाची अगदी बारीक ठिपक्यासारखी दिसणारी पण टिकली लावणं हे हिंदू स्त्रीचं प्रतिनिधित्व करतं. मुस्लिम किंवा ख्रिश्चन स्त्रिया कपाळावर काहीच लावत नाहीत. आपल्याकडे मात्र ते अशुभ किंवा विधवेचे लक्षण मानतात.
पूर्वी हळदी कुंकवाला आलेली ख्रिश्चन शेजारी मला मनगटाला हळदीकुंकू लावायला सांगायची. तर एकदा इजिप्तमध्ये एका तिथल्या मुस्लिम गाईडला माझ्या कपाळावरची टिकली आवडली त्याच्या बायकोसाठी त्याने माझ्याकडून टिकलीचे पाकीट मागून घेतले. आंघोळ करून आल्यावर टिकली लावली नाही किंवा कधी टिकली चुकून पडली तर घरातले लगेच विचारतात आज टिकली लावली नाही का कारण त्यांना ती माझ्या चेहऱ्यावर बघायची सवय झालेली असते. असंही टिकली ही चेहऱ्याची शोभा वाढवण्यासाठीही लावली जाते सोळा शृंगारात तिला महत्त्वाचे स्थान आहे. परदेशात ही फिरताना तुमच्या टिकलीकडे बघून लोक तुम्ही भारतीय हिंदू असल्याचे ओळखतात, ती आपली ओळख आहे. ती ओळख जपली पाहिजे पण आजकालच्या तरुण पिढीला टिकली किंवा तिलक लावणे गावंढळपणाचे वाटते त्यामुळे बऱ्याच मुली लावत नाहीत. पण आपली आज्जी पणजी आठवून पहा कपाळावर मोठ्ठा चांगलं ठसठशीत रुपया एवढा कुंकवाचा टिळा लावत होत्या. त्यांना ते शोभूनही दिसत होतं. पुरुषांमध्ये वारकरी पंथाचे लोक असा टिळा लावताना दिसायचे. काही काही लोकांची ती निशाणी ठरते. उषा उत्तुप यांच्या कपाळावरची मोठी टिकली, उमा देवीची उभी रेघ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कपाळावरचा तिलक, पेशवेकालीन स्त्रियांची चंद्रकोर, बाळाच्या कपाळावरचा काळा टीका.
काही शैव कपाळावर भस्माचे आडवे पट्टे ओढतात. लिंगायत लोकात कपाळावर आडव्या रेघांचा पांढऱ्या रंगाचा टिळा लावतात. तर साई भक्त उदी लावतात. मारुती भक्त शेंदूर लावून घेतात. अशा तऱ्हा अनेक बघायला मिळतील पण त्या अनेकतेत एकता असते ती हिंदुत्वाची खूण असलेली. पूर्वी आता आम्ही लावतो तशा रेडिमेड टिकल्या येत नसत त्यामुळे बायकांना कपाळावर आधी मेण लावून त्यावर पिंजर म्हणजे पावडर स्वरूपातलं कुंकू लावावं लागे आता हव्या त्या डिझाईनच्या टिकल्या विकत मिळतात. कधी कधी या गोष्टी चांगल्या प्रतिच्या नसतील तर अलर्जी होण्याची शक्यता असते. असे हे सौभाग्याचे लक्षण असलेलं कुंकुम तिलक लावणं आणि लावून घेणं ही भाग्याची गोष्ट मानली पाहिजे आणि तिचा स्वीकार केला पाहिजे. मग बघणारा त्यावर लगेच कमेंट देईल, ‘हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाळीला टिळा, अन फॅशन मराठी शोभतेय तुला.
- प्रतिभा कारंजकर, फोंडा