बार्देश : कांदोळीत रेंट अ कॅबच्या धडकेत ब्रिटिश पर्यटक ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
बार्देश :  कांदोळीत रेंट अ कॅबच्या धडकेत ब्रिटिश पर्यटक ठार

म्हापसा :  कांदोळी येथे देशी पर्यटकाच्या रेंट अ कॅब कारची धडक बसल्याने एका वृध्द  ब्रिटिश पर्यटकाचा मृत्यू झाला. हरीष चुनीलाल सोळंकी (८६) असे मयत पर्यटकाचे नाव आहे. तर या घटनेत जखमी झालेल्या तेंच्या  पत्नी चंद्रकांता सोळंकी (८१) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी विकी ओमप्रकाश जैन (४८, रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) यास अटक केली.

हा अपघात शुक्रवारी सकाळी १०.०५ च्या सुमारास कांदोळी येथील फिशरमन कोव्ह रेस्टॉरन्टजवळ घडला होता. संशयित आरोपी विकी जैन हा सिकेरी ते कळंगुटच्या दिशेने रेंट अ कॅब कारने जात होता. वाटेत संशयिताचे कारवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूने चालणार्‍या वृध्द ब्रिटीश पादचारी पर्यटकांना त्याने ठोकर दिली. या अपघातात हरीष व त्यांची पत्नी चंद्रकांता हे वयोवृध्द दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

दरम्यान जखमींना लगेच कांदोळी आरोग्य केंद्रात व नंतर तिथून गोमेकॉत पुढील उपचारार्थ नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सांयकाळी हरीष सोळंकी यांचे निधन झाले. तर जखमी चंद्रकांता सोळंकी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत कार चालक विकी जैन याच्याविरूध्द पोलीस हवालदार सुदत्त खडपे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भा.न्या.सं.च्या १२५(अ) व १२५(ब) कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.

पोलिसांनी भारतीय दुतावासाच्या सहाय्याने मयताच्या कुटूंबियांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विघ्नेश नाईक हे करीत आहेत.   

हेही वाचा