१० हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत; बचाव कार्य सुरू
नवी दिल्ली : दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शुक्रवारी उत्तर रात्री २.३० वाजता चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. २२ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १४ जणांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यापैकी ४ जणांना मृत घोषित केले. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहेत.
रात्री उशिरा २:५० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचून तात्काळ पोलिसांच्या सहकार्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अशी माहिती, विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी दिली. शुक्रवारी रात्री दिल्लीतील हवामान अचानक बदलले. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक भागात नुकसान झाले. दरम्यान, या दुर्घटनेचा तपास सुरू असून, इमारतीच्या बांधकामात कोणतीही त्रुटी किंवा निष्काळजीपणा होता का, याची चौकशी केली जात आहे.