मांद्रेत ९० व्हिला उभारणीस दिलेली परवानगी मागे न घेतल्यास आंदोलन

आज ग्रामस्थ मांद्रे पंचायत मंडळ, सचिवांची घेणार भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:40 pm
मांद्रेत ९० व्हिला उभारणीस दिलेली परवानगी मागे न घेतल्यास आंदोलन

पेडणे : मांद्रे पंचायत मंडळाच्या बैठकीत पंचायत क्षेत्रात ९० व्हिलांना परवानगी देणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्या ठरावाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून हा ठराव नामंजूर करावा यासाठी नागरिक १९ रोजी दुपारी साडेबारा वाजता मांद्रे पंचायत कार्यालयात सरपंच आणि पंचायत सचिवांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहेत, अशी माहिती अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी दिली.

अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी शुक्रवारी जागरुक ग्रामस्थांची बैठक पंचायत कार्यालयाच्या परिसरात घेतली. यावेळी ते बोलत होते.

अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले की, मांद्रे पंचायत क्षेत्रात कोणत्याच प्रकारच्या व्हिला, मेगा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशा प्रकारचा ठराव मांद्रे ग्रामसभेमध्ये मंजूर करुनही पंचायतीने त्या ठरावाची कार्यवाही न करता ते ठराव कचऱ्याच्या टोपलीत टाकले. १७ रोजी पंचायत मंडळाची बैठक होऊन एकूण ९० व्हिलांना परवानगी दिल्याची बातमी सामाजिक ग्रुपमध्ये व्हायरल झाल्यानंतर काही जागरुक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

अॅड. प्रसाद शहापूरकर म्हणाले की, मांद्रे पंचायत क्षेत्रात पर्यायाने इतर भागात रस्त्याच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी मेगा प्रोजेक्ट, इमारती, व्हिला उभारताना पाण्याची सोय कशा प्रकारची केली जाईल, पाणी उपलब्ध आहे की नाही? ते नसेल तर या प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असे पत्र आमदार जीत आरोलकर यांनी पेडणे उपजिल्हाधिकारी आणि टीसीपी खात्याला दिले होते. त्या पत्राची कार्यवाही पंचायत मंडळांनी करावी, अशी मागणी अॅड. शहापूरकर यांनी केली.

मांद्रे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आताच्या जमिनी पुढील पिढीला सुरक्षित त्यांच्या हातात देण्यासाठी जागरुक नागरिक पुढील कृतीतून मार्ग काढतील, असे विनायक च्यारी म्हणाले.

गाव सुरक्षित ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

यावेळी अनेक ग्रामस्थांनी मांद्रे पंचायतीने व्हीलासाठी दिलेली परवानगी त्वरित मागे घ्यावी. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देऊन १९ रोजी आम्ही ग्रामस्थ पंचायत मंडळ, पंचायत सचिवांची भेट घेणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कृतीतून गाव सुरक्षित ठेवण्याच्या नजरेतून आंदोलन करू, असे मत व्यक्त केले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी विचार मांडले.