वेळीच आग आटोक्यात आणल्याने जलवाहिनीचे टळले नुकसान
साखळी : सुर्लतील शेतकऱ्यांना खाण खंदकातून पाणी पुरविण्यासाठी सरकारच्या जलस्रोत खात्यातर्फे साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या प्रकल्पाच्या जलवाहिनीला आग लावून नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अज्ञातांकडून घडला आहे. आगीच्या घटनेमुळे जलवाहिनीला छिद्रे पडून गळती लागली आहे.
खाण खंदकातून पाणी पंपींग करुन ते खालील एका खाण खंदकात जमा केले जाते. तेथून स्वयंचलित यंत्राद्वारे बागायतींमध्ये पाणी पुरवायचे, असा हा अभिनव प्रकल्प आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प देशातील अभिनव प्रकल्प ठरला आहे. याची पाहणी केंद्रीय खाण मंत्री जयकिशन रेड्डी यांनी करुन या प्रकल्पाचे कौतुक केले होते.
सोनशी खाण सुर्ल येथील एका खंदकातून पंप लावून पाणी पंपींग केले जाते. त्या ठिकाणी उच्च क्षमतेचा एक जनरेटर आहे. याच भागात खाणीवरील झाडांना आग लावण्यात आली. खाणीवर धुराचे लोट येत असल्याने शेतकरी व जलस्रोत खात्याचे अधिकारी धावून आले. जंगलाला आग लागून जलवाहिन्यांनाही आग लागल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.
जवळच असलेल्या सेसा खाण कंपनीकडून पाण्याचा टँकर मागविण्यात आला. तसेच डिचोली अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. सेसा कंपनीच्या टँकरमुळे आगीवर नियंत्रण आणण्यास मदत झली. तरीही जलवाहिन्यांना आगीची बरीच झळ बसल्याने अनेक ठिकाणी सदर जलवाहिनीला छिद्रे पडून गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. आग विझविण्यात यश आले. अन्यथा या जलवाहिनींसह जनरेटर सेटही जळून खाक झाला असता, असे शेतकरी विष्णू नाटेकर यांनी सांगितले.
संबंधितांवर कारवाई करावी : नाटेकर
सरकारने सुमारे ४.५० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचा सुर्लतील सुमारे ९५ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी सुमारे साडेसहा किलोमीटरपर्यंत नेण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी विष्णू नाटेकर यांनी केली.