अग्निशामकचे नितीन रायकर यांना ब्रॉन्झ डिस्क पुरस्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 10:49 pm
अग्निशामकचे नितीन रायकर यांना ब्रॉन्झ डिस्क पुरस्कार

पणजी : अग्निशामक दलाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांना अग्निशमन सेवा सप्ताह २०२५ निमित्त केंद्रीय गृह खात्यातर्फे ब्रॉन्झ डिस्क आणि प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले. रायकर यांच्या कार्यकाळात नेतृत्वगुण, वचनबद्धता आणि विशिष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा सप्ताह २०२५ निमित्त हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नितीन रायकर ३ जानेवारी १९९१ रोजी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात सहाय्यक स्टेशन अग्निशमन अधिकारी म्हणून रुजू झाले. २४ डिसेंबर १९९८ रोजी त्यांना स्टेशन अग्निशमन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. ११ ऑगस्ट २०१० रोजी त्यांना सहाय्यक विभागीय अधिकारी पदावर बढती मिळाली. त्यांनी विविध प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रमांमधून भाग घेतला आहे.

रायकर यांना २००८ मध्ये मुख्यमंत्री अग्निशमन सेवा पदक प्रदान करण्यात आले. तर, १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांना प्रतिष्ठित राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक देऊनही सन्मानित करण्यात आले. त्यांनी २००१ च्या गुजरात भूकंप बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. याबद्दल त्यांना गुजरात सरकार आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी या दोन्हींकडून कौतुकास्पद प्रमाणपत्रे देण्यात आली.