पणजी : खाजणे-पेडणे येथील अल्पवयीन दलित मुलीला मारहाण केल्याच्या प्रकरणातील संशयित समीर कोरगावकर याला पोलिसांनी भेडशी-सिंधुदुर्ग येथून अटक केली. या प्रकरणी तक्रार नोंद झाल्यापासून संशयित फरार होता.
प्रकरण काय ?
उपलब्ध माहितीनुसार १४ एप्रिल रोजी सायंकाळी संशयित आरोपी समीर कोरगावकर हा खाजने येथून आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या पीडित मुलीची दुचाकी त्याच्या बाजूने आली. त्यामुळे दोघांत शाब्दीक चकमक उडाली. नंतर संशयित आरोपी मुलीच्या अंगावर धावून गेला व तिचे टी-शर्ट पकडून जातीवाचक उल्लेख केला, अशी तक्रार करण्यात आली. मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात रीतसर तरकार नोंदवली.
दरम्यान या योग्य वेळी कारवाई करण्यात आली नाही, हे कारण देऊन पेडणे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण देसाई यांना रिझर्व्ह लाईनमध्ये हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले. तर उपअधीक्षक ब्राझ मिनेझिस यांना दोन दिवसांत चौकशी अहवाल देण्याच्याही सूचना करण्यात आल्या.
दरम्यान उपअधीक्षकांनी तपासचक्रे गतिमान करत भेडशी-सिंधुदुर्ग येथून कोरगावकर यांचा मागोवा काढला. नंतर त्याला ताब्यात घेऊन रितसर अटक करण्यात आली.