मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील उत्तोर्डा येथे रेल्वे रुळानजीक एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. पोलिसांच्या चौकशीत मारिया दुरादो असे महिलेचे नाव असल्याचे समोर आले असून कोकण रेल्वे पोलिसांनी याची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी कोकण रेल्वे पोलिसांना उत्तोर्डा येथील चर्चजवळ असलेल्या रेल्वे रुळानजीक एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता रेल्वेरुळानजीक एका महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वेच्या धडकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. पंचनामा करत मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात पाठवण्यात आला. कोकण रेल्वे पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे केलेल्या चौकशीनंतर सदर महिलेचे नाव मारिया फातिमा दुरादो (५९) असून ती उत्तोर्डा माजोर्डाच्या ग्रॅब्रियल क्रुझवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. कोकण रेल्वे पोलिसांकडून सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मडगाव रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर माडेल फातोर्डा येथील २१ वर्षीय जेरीको दा कोस्ता याचा मृतदेह रेल्वेरुळानजीक आढळून आला होता. याप्रकरणातही कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. रेल्वेच्या धडकेने होणाऱ्या मृत्युंवर अंकुश ठेवायचा असेल तर, रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याची व रेल्वे रुळ ओलांडणार्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे अनेकांनी व्यक्त केली आहे.