चिकनच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार कुंडईतील कंपनी

म्हापशात चिकन विक्री दुकानदारांसमवेत पालिकेची बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 11:57 pm
चिकनच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार कुंडईतील कंपनी

म्हापसा : येथील पालिका क्षेत्रातील चिकन विक्री दुकानातील कचऱ्याची विल्हेवाट कुंडईस्थित सरकारच्या बायोटीक वेस्ट सोल्यूशन या कंपनीमार्फत करावी, अन्यथा दुकाने सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा म्हापसा पालिकेने चिकनविक्री दुकानदारांना दिला आहे.

बुधवारी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी पालिका मटन मार्केट प्रकल्पासह शहरातील चिकन विक्री दुकानदारांसमवेत बैठक घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, पालिका मार्केट चेअरमन नगरसेवक साईनाथ राऊळ, नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर, पालिका अभियंता आगुस्तिन मिस्किता व प्रशांत नार्वेकर उपस्थित होते. बैठकीला जवळपास २० चिचन विक्री दुकानदार उपस्थित होते.

म्हापसा शहरात ८० पेक्षा जास्त चिकन सेंटर आहेत. या दुकानांमध्ये दरदिवशी दीड ते दोन टन कचरा तयार होतो. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने आसगाव पठारावरील जागी कचरा टाकण्यास पालिकेला बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनावर परिणाम झाला आहे. पालिकेकडून ओल्या आणि सु्क्या कचऱ्याची सध्या साळगाव आणि कुचेली प्रकल्पामार्फत विल्हेवाट लावली जाते. तर पालिकेसमोर चिकन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न देखील उभा आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

चिकन सेंटर दुकानांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुंडई औद्योगिक वसाहतीमधील बायोटीकवेस्ट सोल्यूशन कंपनीचे सहकार्य घेऊन त्यांच्यासोबत करार करावा. या कराराच्या बाबतीत येत्या दोन दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी संबंधितांना दिला.

चिकनचा कचरा घेण्यासाठी या कंपनीचे प्रतिकिलो शुल्क जास्त आहे. त्यामुळे ते थोडे कमी करावे, अशी सूचना दुकानदारांनी केली. मात्र, कंपनीचा दर निश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत हजर नसलेल्या चिकन सेंटरवाल्यांना याबाबतची सूचना देण्याचे यावेळी ठरवले.

बायोटीक कंपनीशी करार करण्याचा निर्णय

पालिकेच्या सूचनेनुसार म्हापसा शहरातील चिकन सेंटरवाल्यांनी बायोटीक कंपनीशी कचरा उचलून नेण्यासाठी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार आगामी दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. पालिकेची कारवाई टाळणे तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

आम्ही पालिका क्षेत्रातील चिकनच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने चिकन विक्री दुकानदारांना बायोटीक कंपनीशी करार करण्याची सूचना केली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास दुकानदारांनी वेळकाढू धोरण अवलंबवल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश दिले आहेत, असे नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी सांगितले. 


हेही वाचा