देवानंद नाईक यांच्या समितीची मुख्यमंत्री, दामू नाईक यांच्याकडे मागणी
पणजी : उपेंद्र गावकर यांनी भंडारी समाजाची स्वतंत्र समिती स्थापन करत भंडारी समाजाचा स्वतंत्र सर्व्हे करण्याची घोषणा केल्यानंतर आक्रमक झालेल्या देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेत, राज्यातील सर्वच जातींच्या गणनेची आणि पिळर्ण कोमुनिदादची पाच हजार चौरस मीटर जमीन भंडारी भवनासाठी देण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि दामू नाईक यांनी आपल्याला दिल्याची माहिती देवानंद नाईक यांनी शुक्रवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या भंडारी समाजाच्या निवडणुकीनंतर समाजाच्या नेत्यांमध्ये वादंग निर्माण झालेले होते. या निवडणुकीत आपल्या पॅनेलचा विजय झाल्याचे म्हणत देवानंद नाईक यांनी आपल्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन केली. परंतु, माजी समितीने समाजाच्या कायद्यात केलेले बदल बेकायदा असल्यामुळे देवानंद नाईक यांची समितीही बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा करीत उपेंद्र गावकर गटाने जिल्हा निबंधकांकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर सुनावणी सुरू असतानाच उपेंद्र गावकर यांनी दोन दिवसांपूर्वी भंडारी समाजाची नवी समिती स्थापन केली. राज्यातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या जातींमध्ये भंडारी समाजाच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यभरातील भंडारी समाजाच्या नागरिकांची गणना करून ओबीसी आरक्षणातील २० टक्के वाटा भंडारी समाजाला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. उपेंद्र गावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भंडारी समाजातील दोन गट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते.
या पार्श्वभूमीवर, देवानंद नाईक यांच्या गटाने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. केवळ भंडारी समाजाची नव्हे, तर राज्यातील सर्वच जातींच्या गणनेची मागणी या गटाने केली. तसेच पिळर्ण कोमुनिदादची पाच हजार चौरस मीटर जमीन भंडारी भवनासाठी देण्याची विनंतीही त्यांनी केली. आपल्या दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही नाईक यांनी सांगितले. समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक आणि इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.