पणजी : याचिकादाराला माहिती देण्यास विलंब केल्याने त्याचा वेळ, शक्ती तसेच पैसेही खर्च झाले. याची भरपाई म्हणून मागितलेली माहिती देण्यासह १० हजार रूपयांंची नुकसानभरपाई याचिकादाराला देण्याचा आदेश मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) अरविंदकुमार नायर यांनी वास्तुशिल्पकला महाविद्यालयाला (आर्किटेक्चर कॉलेज) दिला आहे. या आदेशामुळे याचिकादार रॉय डिसोझा यांना दिलासा मिळाला आहे.
रॉय डिसोझा यांनी वास्तुशिल्पकला महाविद्यालयाच्या माहिती अधिकाऱ्यांकडे (पीआयओ) निशा सुआरीससह इतर कर्मचाऱ्यांची हजेरी, नियुक्या याबाबत माहिती हक्क कायद्याअंतर्गत १५ जानेवारी २०२१ रोजी मागितली होती. दिलेली माहिती समाधानकारक नसल्याने त्याने एफएएकडे (फर्स्ट अपीलीट अॅथोरीटी) पहिले अपील सादर केले. एफएएच्या आदेशानंतरही समाधान न झाल्याने माहिती आयोगाकडे त्यांनी दुसरी अपील (याचिका) सादर केली. ही याचिका निकालात काढताना मुख्य माहिती आयुक्तांना १० हजार रूपयांची नुकसानभरपाई देण्याच्या आदेशासह माहिती देण्याचा आदेश दिला आहे.
रॉय डिसोझा यांनी व्हिजीटींग फॅकल्टीसह हजेरीपटाची फायल मागितली होती. बायोमेट्रिक मशिनवर नोंद झालेल्या वेळाही त्यांनी मागितल्या होत्या. तसेच २०१८नंतर व्हिजीटींग फॅकल्टीची विषयासह नियुक्त्यांचीही सविस्तर माहिती मागितली होती. तसेच ततकालीन प्राचार्य आशिष रेगे यांची व्यक्तीगत फाईलचीही मागणी केली होती. हजेरी तसेच व्हिजीटींग फॅकल्टीच्या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली मात्र पाहण्यासाठी फाइल्स दिल्या गेल्या नाहीत. यामुळे रॉय डिसोझा यानी पहिले अपील दाखल केले. पहिल्या अपीलात प्रतिवादी असलेला एक माहिती अधिकारी हाच एफएए असल्याने त्याने सुनावणीस सुरवात केली. प्रतिवादी असल्याने त्याने एफएए (फस्ट अपीलीट अॅथोरिटी) म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक होते. तरीही सुनावणी झाली. यानंतर एकाच वेळी प्रतिवादी व न्यायाधीश होऊ शकत नाही. असे म्हणून एफएए असलेल्या प्राचार्यांनी सुनावणीतून माघार घेतली. यामुळे याचिकादाराने माहिती आयोगाकडे दुसरे अपील (याचिका) दाखल केली.
हजेरीपटाच्या प्रमाणीत प्रती १० दिवसांत याचिकादाराला द्याव्यात. तसेच दिनेश सरीन यांच्या नियुक्तीपत्राची प्रत याचिकादाराला द्यावी. महाविद्यालयात प्रत नसल्यास लेखा संचालनालयाकडे प्रत देण्यासाठी १५ दिवसांच्या आत अर्ज करावा. प्रत मिळताच ती याचिकादाराला द्यावी. तसेच याचिकादाराचा वेळ व शक्ती खर्च झाल्याने १० हजार रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सीआयसी अरविंदकुमार नायर यांनी दिला आहे. वास्तुशिल्पकला महविद्यालयाच्या पीआयओंना ८ मे २०२५पर्यंत कार्यवाही अहवाल देण्याचेही आदेशात म्हटले आहे.