सत्तरी : श्रवण बर्वे खून प्रकरण : एकाला अटक

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
सत्तरी : श्रवण बर्वे खून प्रकरण : एकाला अटक

पणजी  : नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे खून प्रकरणी वाळपई पोलिसांच्या तपासाला गती मिळाली असून, या प्रकरणी वासुदेव ओझेकर (४२, आंबेडे-नगरगाव) याला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याने तपासात निर्णायक वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हत्येमागील कारणांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. 

काल (मंगळवार) सायंकाळी पोलिसांनी सुमारे १८ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, ही कारवाई चुकीची असून स्थानिकांना जबरदस्तीने या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत असा आरोप करून सुमारे १०० ग्रामस्थांनी वाळपई पोलीस स्थानकावर धडक दिली. या ग्रामस्थांनी ताब्यात घेतलेल्यांना त्वरित सोडण्याची मागणी केली.

यानंतर पोलिसांनी १५ जणांना मुक्त केले. उर्वरित तीन जणांना पोलीस पुढील चौकशीसाठी पर्वरी येथे घेऊन गेले  होते. यापैकी दोघांना आता सोडले असून, एकाची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी निगडीत महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

प्रकरण काय आहे?

श्रवण देविदास बर्वे याचा संशयास्पद मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून व श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण सत्तरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

हेही वाचा