पणजी : महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. सध्या याबाबतची प्रतिबंधात्मक 'एचपीव्ही' लस उपलब्ध झाली असून या लसीची यशस्वीरित्या चाचणीही झाली आहे. त्यामुळे या लसीबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नयेत असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी रोटरी क्लब ऑफ पणजीतर्फे आयोजित मोफत लसीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. केदार फडते, डॉ. वंदना धुमे, गौरीश धोंड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड लसीकरणावेळी त्या लसीबद्दल देखील चुकीच्या कल्पना तयार झाल्या होत्या. आता काही जणांचे सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीबाबत गैरसमज झाले आहेत. या लसीचे काम समजून न घेता चुकीच्या माहितीच्या आधारे हे समज तयार होत आहेत. लस घेतल्यामुळे अमुक काहीतरी होईल असे सांगितले जाते. मात्र हे चुकीचे असून विविध डॉक्टर्सनी देखील ही लस खात्रीशीर असल्याचे सांगितले आहे.
ते म्हणाले, ही लस चांगली असल्याचे केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. भविष्यात केंद्र सरकारच्या आरोग्य उपक्रमात या लसीचा अंतर्भाव केला जाणार आहे. त्यावेळी ही लस मोफत देण्याचा केंद्राचा विचार आहे. पूर्वी अनेकांना पोलिओ होत होता. मात्र लसीकरण उपक्रमामुळे आता भारत पोलिओ मुक्त झाला आहे. त्याचप्रमाणे सर्व्हायकल कॅन्सरसाठी आतापासून लसीकरण सुरू केल्यास पुढील काही वर्षात हा रोग होणार नाही. त्यामुळे याविषयी गैरसमज न ठेवता लस घेणे आवश्यक आहे.
जिभेवर ताबा ठेवा
मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. तरीही नियमित व्यायाम आणि योग्य आहार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने देखील अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे आपल्या जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक आहे.