पणजी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीने १० जागांवर भरती केली जाणार आहे. या सर्व जागा एका वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील. यामध्ये २ मानसोपचर तज्ज्ञ, व्हिजीटिंग सल्लागार, समुपदेशक, मानसशास्त्रीय परिचारिका, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, कर्ण बधीर मुलांसाठी प्रशिक्षक ,ऑडियोलोजिस्ट, ऑडियो मेट्रिक सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (प्रत्येकी एक) पदावर भरती केली जाईल.
या जागांसाठी पुढील आठवड्यापासून ते पदे भरेपर्यंत आरोग्य खात्यात सकाळी १० ते १२.३० पर्यंत नोंदणी आणि थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. व्हिजीटिंग सल्लागार पदासाठी एमडी मेडिसिन किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी मासिक १ लाख रुपये वेतन दिले जाईल. उमेदवाराला एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. समुपदेशक पदासाठी सामाजिक शास्त्र किंवा अन्य समतुल्य विषयाची पदवी असणे आवश्यक आहे.
मानसोपारतज्ज्ञ पदांसाठी उमेदवारी एमडी मानसोपचार पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे इस्पितळात एक वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी मासिक ८५ हजार रुपये वेतन देण्यात येईल. परिचारिका पदासाठी बीएससी नर्सिंग व मानसशास्त्रीय पदविका असणे आवश्यक आहे. यासाठी २५ हजार मासिक वेतन आहे. सामाजिक कार्यकर्ता पदासाठी ४० हजार रुपये वेतन असेल. तर ऑडियोलॉजीस्ट पदासाठी ३० हजार रुपये वेतन देण्यात येईल.
अपवाद वगळता सर्व पदांसाठी उमेदवारांकडे १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील विविध ठिकाणी नियुक्त केले जाईल. त्यांना सेवेत नियमित केले जाणार नाही. काही पदांसाठी मेडिकल कौन्सिलची नोंदणी असणे गरजेचे आहे. मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन खात्याने केले आहे.