सासष्टी : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा!

विश्व हिंदू परिषदेकडून दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
सासष्टी : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा!

मडगाव : वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन करताना हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. केंद्रीय सुरक्षा दलाला नियुक्त करुन हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी व्हावी. बांगलादेशाच्या सीमेवर तारेचे कुंपण घालावे, अशा मागण्या विश्व हिंदू संघटनेकडून करण्यात आलेल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील विश्व हिंदू संघटना व इतर हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांची भेट घेतली. यावेळी श्याम नाईक, आनंद आंगडी, राजेंद्र मळकर्णेकर, दिक्षत नाईक, ठाकूर नाईक आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने निवेदन सादर करून पश्चिम बंगालातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. निवेदन सादर केल्यानंतर विश्व हिंदू संघटनेचे गोवा विभागमंत्री मोहन आमशेकर यांनी सांगितले की, संघटनेकडून देशभरातील जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन सादर केली जात आहेत. याव्दारे पश्चिम बंगालमध्य हिंदू अल्पसंख्याक परिसरात हिंदूंवर अन्वयित अत्याचार केले जात आहेत. 

पोलीस सरकारच्या दबावाखाली असल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट आणण्यात यावी व हिंदूंवरील अत्याचार थांबवले जाण्याची गरज आहे. याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलाला त्याठिकाणी नेमूण हिंसाचार रोखण्यात यावा व दोषींवर कारवाई व्हावी. याशिवाय एनआयएकडून या हिंसाचाराची सखोल चौकशी होण्याचीही गरज आहे. याशिवाय बांगलादेशातून घुसखोर आलेले असून त्यांना पश्चिम बंगालातून माघारी पाठवण्यात यावे. सीमेवर तारेचे कुंपण घालून ती बंद करण्यात यावी. हिंदूंवरील अत्याचार बंद होऊन पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पध्दतीने सरकार यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून सदर निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.



हेही वाचा