पणजी : वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याची तारीख संपल्यानंतर भरावे लागणारे अतिरिक्त शुल्क ३१ मे २०२५पर्यंत १ हजार रूपयांपेक्षा जास्त असणार नाही. याबाबतची अधिसूचना वाहतूक संचालनालयाने जारी केली आहे. यामुळे फिटनेस प्रमाणपत्राचे वेळेत नुतनीकरण न करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मोटारसायकल, तिचाकी वाहन, लायट मोटर वेव्हीकल, मध्यम माल वा प्रवासी वाहन व अवजड माल व प्रवासी वाहन यांच्यासाठी ही सवलत असणार आहे.
महिन्याभरापूर्वीच वाहतूक खात्याने विविध प्रमाणपत्रे तसेच परवान्यांसाठीचे शुल्क निश्चित करणारी अधिसूचना जारी केली होती. वेळेत नूतनीकरण न केल्यास भराव्या लागणाऱ्या अतिरिक्त शुल्कात वाढ केली होती. यानंतर फिटनेस प्रमाणपत्र नुतनीकरणासाठीचे अतिरिक्त शुल्क मे पर्यंत १ हजार रूपयांपेक्षा जास्त भरावे लागणार नाही, असे स्पष्ट करणारी अधिसूचना जारी केली आहे.