फोंड्यातील प्रकार : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घटनास्थळी तपास करण्यासाठी दाखल झालेले पोलीस आणि त्यांना माहिती देताना स्थानिक नागरिक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : बोणबाग-दुर्गाभाट फोंडा येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालिकेला गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिला मृत्यूने गाठले. अनाबिया शेख असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.
शेख कुटुंब मूळचे शापूर फोंडा येथील आहे. शेख दाम्पत्याला विवाहानंतर तब्बल पाच वर्षांनी मूल झाले होते. त्यांनी तिचे नाव अनाबिया ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी अनाबिया आपल्या आईसह मामाच्या घरी दुर्गाभाट येथे आली होती. शुक्रवारी सकाळी ७ वा. तिचा मामा कामानिमित्ताने घराबाहेर पडला. दरवाजा उघडाच होता. १ वर्ष ८ महिन्यांची अनाबिया खेळत खेळत घराबाहेर पडली. तिची आई घरात कामात व्यग्र होती. अनाबिया घरातून बाहेर पडल्याचे तिच्या लक्षातही आले नाही. अनाबिया चालत चालत रस्त्यावर गेली. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा कळप होता. १५ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी तिला तब्बल ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. ती आक्रोश करत होती; परंतु रस्त्यावर कोणीच नव्हते. मॉर्निंग वॉकसाठी तेथून जाणाऱ्या लोकांच्या कानावर तिचे रडणे आले. त्यांनी आरडाओरड करून कुत्र्यांना हुसकावून लावले आणि अनाबियाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. रक्तबंबाळ अवस्थेत तिला ताबडतोब फोंड्यातील आयडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. अनाबियाचा मृत्यू कुत्र्यांनी चावल्यामुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक यांनीही घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांकडून माहिती घेतली. शेख कुटुंबियांचे सांत्वनही त्यांनी केले. चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुशांत गावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक माहितीनुसार, ज्या भागात ही घटना घडली, तेथे लोक सर्रास उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे अन्नाच्या शोधात असलेल्या भटक्या कुत्र्यांचा या ठिकाणी मोठा वावर असतो. चिमुकलीवरील हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर
गोव्यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकही त्रस्त झाले आहेत. जानेवारी २०२५ या एकाच महिन्यात १,७८९ कुत्र्यांच्या चाव्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. म्हणजे भटक्या कुत्र्यांनी दररोज सरासरी ५७ जणांचे चावे घेतले. ऑगस्ट २०२४ मध्ये हणजूण येथे एका ७ वर्षांच्या मुलाचा पिटबुलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. गोवा सरकारने पिटबुल आणि रॉटवायलर यांसारख्या आक्रमक जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्या मालकांना कुत्र्यांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यात अंदाजे ५६,००० भटकी कुत्री आहेत. बाणावली, मोबोर, ताळगाव, शिवोली, केळशी परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकजण जखमी झाले आहेत.