अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा : दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
वाळपई शहरात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
वाळपई : सत्तरी तालुक्यामध्ये भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर चर खोदून या वाहिन्या घालण्यात येत आहेत. हे खोदकाम सुरू असताना गुरुवारी संध्याकाळी दाबोस पाणी प्रकल्पाची प्रमुख जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. दोन दिवसापासून तालुक्याच्या अनेक भागांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी टँकर पोहोचले नाहीत. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. शुक्रवारी पुन्हा एकदा या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झाले नव्हते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्यातरी पाणी प्रकल्पाची यंत्रणा बंद ठेवावी लागलेली आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र एकदा रिकामी झालेली जलवाहिनी पुन्हा भरण्यासाठी किमान आठ तास लागतात. यामुळे शनिवारी दुपारपर्यंत अनेक गावांमध्ये नळ कोरडेच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाल्यामुळे पंचांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून टँकर पाठवण्याची विनंती केली. सदर गावामध्ये टँकर पाठविण्यात आल्यानंतर आपल्या राजकीय विरोधकांना वगळून आपल्या समर्थकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला.
विनाखंडित वीजपुरवठा पुरवठा प्राप्त व्हावा, यासाठी भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. जवळपास एक वर्षापूर्वी भिंरोडा या ठिकाणी सत्तरी तालुक्यातील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. वाळपई नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी शहीद स्तंभानजीक भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटली व लाखो लिटर पाणी वाया गेले. रात्री उशिराच या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्रभर सदर काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्यात आली.
जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी अनेक गावातून पाणी पुरवठा कार्यालयाला टँकर पाठवण्याच्या विनंतीचे फोन येऊ लागले. मोजकेच टॅंकर असल्यामुळे अनेक गावांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दिवसभर अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती.
बॉक्स
आमदार डॉ. राणे यांच्याकडून पाठपुरावा
आमदार डॉ. देविया राणे यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाचा पाठपुरावा केला. जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. अनेक नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून या संदर्भाची माहिती दिली. आमदार राणे यांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सदर काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.