कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर : अक्षत कौशल, पर्यटक पोलीस अधीक्षक.
पणजी : या वर्षी आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील किनारी भागांत पर्यटन पोलिसांनी एक हजारहून अधिक टाऊट्सवर कारवाई केली आहे, अशी माहिती पर्यटन पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील शांतता भंग करणाऱ्या प्रकारांवर अंकुश असावा यासाठी पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पर्यटक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या १९३ पर्यटकांवर, समुद्रकिनारी कचरा फेकणाऱ्या ५४५ जणांवर, किनाऱ्यावर वाहन चालवणाऱ्या १४ जणांवर, आणि कोटपा कायद्याअंतर्गत २६५ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत
पोलीस टाऊट्सना ताब्यात घेतात आणि कायद्यानुसार दंड आकारतात. जे वारंवार कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना अटकही केली जाते. कळंगुट, हणजूण, मांद्रे येथील पोलीस स्थानकांत याबाबत सर्वाधिक तक्रारी नोंद होतात. दरम्यान, कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे असे कौशल म्हणाले.
समन्वय वाढवण्याचा प्रयत्न
सर्व शॅकधारक आणि स्थानिक व्यावसायिकांशी नियमित बैठक घेतली जाते. पोलीस कर्मचारी या ठिकाणी १५ दिवसांनी भेट देतात. काही अडचण निर्माण झाली तर पर्यटकांनी पोलिसांकडे थेट संपर्क साधावा, असे आवाहनही पर्यटन अधीक्षक अक्षत कौशल यांनी केले.
सुरक्षित पर्यटनासाठी कटीबद्ध
टाउटींगसारखे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. गोव्यातील पर्यटन स्थळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. राज्यात पर्यटकांची संख्या वाढत असून, त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत, असे कौशल यांनी स्पष्ट केले.