अन्न व औषध खात्याची कारवाई

मडगाव : नावेली येथील खैबर फॅमिली रेस्टॉरंटवर अन्न व औषध खात्याच्या अधिकार्यांनी कारवाई केली. या रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केले जात असल्याने अधिकार्यांनी हे रेस्टॉरंट बंद केले. याशिवाय परिसरातील आणखी तीन रेस्टॉरंट्सची तपासणी केली.
अन्न व औषध खात्याकडून सध्या मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, स्टॉल्सची तपासणी सुरू केली आहे. अन्न व औषध खात्याकडून मंगळवारी आंब्यांची तपासणी केली होती. केमिकल व्दारे आंबे पिकवून विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर मडगावातील गांधी मार्केटमधील दोन व सोनसडो व नावेलीत प्रत्येकी एक अशा चार गोदामातील आंबे तपासणीसाठी घेण्यात आले.
याशिवाय केळी पिकवण्यात येत असलेल्या मडगाव, नावेली व सां जुझे दी अरीयाल येथील गोदामातही पाहणी केली असता केमिकल आढळून आलेले नाही.
बुधवारी सायंकाळी अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्यासह अन्न व औषध खात्याच्या अधिकार्यांनी नावेली जंक्शननजीकच्या रेस्टॉरंटची तपासणी केली. यावेळी खैबर फॅमिली रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात अस्वच्छ वातावरण आढळून आले. सांडपाणी स्वयंपाकघरातच सोडून देण्यात आल्याचे तसेच अन्न शिजवण्यासाठी योग्य वातावरण आढळून आले नाही. त्यामुळे अधिकार्यांनी रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला.
पाहणीनंतरच अंतिम निर्णय
सदर रेस्टॉरंटच्या मालकाला साफसफाई व इतर कामांसाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर अन्न व औषध खात्याचे अधिकारी पाहणी करतील व त्यानंतरच रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहेत, अशी माहिती अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी दिली. दरम्यान परिसरातील आणखी तीन रेस्टॉरंटचीही पाहणी करण्यात आली व आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.