कळंगुट नाईट क्लब वाद, गँगवार प्रकरण

म्हापसा : नायकावाडा कळंगुट येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये गँगवारातून घडलेल्या स्वप्नील रेडकर (तोर्डा पर्वरी) याच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपी टारझन पार्सेकर (नागवा), सूर्यकांत उर्फ सूर्या बिभीशन कांबळी (शंकरवाडी ताळगाव), इम्रान गणी बेपारी (सांताक्रुज) व सूरज लतिकांत शेट्ये उर्फ बाबू (मेरशी) यांच्यावर आरोप निश्चितीचा आदेश मेरशी येथील उत्तर गोवा फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी दिले आहेत.
न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. महिमा कळंगुटकर, अॅड. सिमरन पोखरे व अॅड. डी. मोपकर तर, सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील कोलेमन रॉड्रिग्ज यांनी युक्तीवाद केला.
ही घटना ५ ऑक्टोबर २०२१ रोजी कळंगुट येथील मासळी मार्केटजवळील ईलिशा इलेक्ट्रॉनिक्सनजिक घडली होती. सूर्या गँग व एल्डो गँग यांच्यात नाईट क्लबवरून वाद होता. क्लब ३९ स्टेप्स हा एल्डो डिसोझा यांच्या मालकीचा होता. तर जखमी स्वप्नील रेडकर हा या क्लबचा बाऊंसर होता.
एल्डो डिसोझा यांचा काका उर्बान डिसोझा हा आपल्या काही साथीदारांसह घटनास्थळी हजर होता. सूर्या कांबळी हा तीन गाड्या भरून आपल्या साथीदारांना घेऊन तिथे आला होता. दोन्ही गट एकमेकांसमोर येताच हाणामारी सुरू झाली.
उर्बान डिसोझा यांच्या मदतीला रेडकर व विलास प्रसन्न हे धाऊन आले. फिर्यादी रेडकर हे आपली दुचाकी पार्क करीत असतानाच संशयित आरोपी त्याच्यावर चाल करून आले, तेव्हा विलास प्रसन्न याने तेथून पळ काढला. नंतर आरोपींनी रेडकर याच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला व त्याच्यावर तलवार, चाकू व लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. तलवारीचा वार फिर्यादीच्या पायावर लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. तरीही संशयितांनी त्याला लोखंडी सळ्यांनी मारहाण केल होती.
पोलिसांनी याप्रकरणी भा.दं.सं.च्या ३२४ व शस्त्र कायदा कलम ७ व २५ अन्वये गुन्हा नोंद करीत त्यांना अटक केली होती. उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
कळंगुट पोलिसांनी संशयितांना केली होती अटक
मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी पोलिसांनी टारझन पार्सेकर याला पकडून ताब्यात घेतले व नंतर अटक केली. तर, ६ रोजी पहाटे तोरसे पेडणे येथे सूर्या कांबळी, इम्रान बेपारी व सूरज शेट्ये या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.