दारूगोळा बेकायदेशीरपणे आयात केल्याच्या प्रकरणात झाली होती अटक

पणजी : दारूगोळा बेकायदेशीरपणे आयात केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये या दोघांना न्यायालयाने १ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. सारिका फळदेसाई यांनी दिला.
वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ ही कंपनी विदेशातून बेकायदेशीररीत्या दारूगोळा आयात करत असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयने वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीची तसेच विदेशांतून आणलेल्या आणि विमानतळावर उतरवलेल्या मालाची तपासणी केली. त्यावेळी डीआरआयला कंपनीने ७ जून २०२५ रोजी ९२ लाख ८३ हजार ४५९ रुपये आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी १८ लाख ३२ हजार ५०६ रुपये किमतीचा माल आयात केल्याचे समोर आले. त्यानुसार डीआरआयने वरील एकूण १ कोटी ११ लाख १५ हजार ९६५ रुपये किमतीचे दोन मोठे कन्साइनमेंट्स जप्त केले होते.
याप्रकरणी संजय सोनी आणि जयेश शेट्ये यांची पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. या आदेशाला डीआरआयने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने संशयितांचा जामीन रद्द करून त्यांना शरण येण्याचा आदेश दिला होता. शरण न येता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याच दरम्यान दोघांनी आव्हान मागे घेतले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी डीआरआयने त्या दोघांना अटक केली. म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची डीआरआय कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांना ६ रोजी मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या दोघांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली. याच दरम्यान त्या दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे तसेच त्यांच्यावर अटी लावून त्यांना जामीन देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. या प्रकरणी न्यायालयाने त्या दोघांना प्रत्येकी १ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
कंपनीच्या अधिकार्यांनी डीआरआयकडे बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच बनावट ई मेल्स सादर करून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच डीआरआयने गुन्हा नोंदवून १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये यांना अटक केली होती.