टायरॉन खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष सुटका

उच्च न्यायालयाचा निवाडा : जन्मठेपेची शिक्षा रद्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th December, 11:43 pm
टायरॉन खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची निर्दोष सुटका

म्हापसा : कळंगुट येथील टायरॉन नाझारेथ (५२) याच्या खून प्रकरणातील आरोपी जोजफ इस्माईल सिक्वेरा, सीऑन सेबेस्तीयन फर्नांडिस व महेश रमेश रामपाल (रा. कांदोळी) या तिघांनाही म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित उच्च न्यायालयाने रद्द करीत त्यांची निर्दोष सुटका केली आहे.

उच्च न्यायालयाच्या द्वीन्यायपीठातील न्यायाधीश आशिष चव्हाण व न्यायाधीश भारती डांगरे यांनी दिलेल्या निवाड्यात नमूद केले आहे की, सरकारी पक्षाने सादर केलेल्या तिन्ही मुख्य साक्षीदारांची साक्ष विश्वसनीय नाही. गुन्हा ‘संशयाच्या पलीकडे’ सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याने कनिष्ठ न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय टिकवून धरता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

उच्च न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. निगेल फर्नांडिस, अॅड. रोहन देसाई, अॅड. रायन मिनेझिस, अॅड. गिनामारीया आल्मेदा यांनी तर सहाय्यक अभियोक्ता सोमनाथ कर्पे, आनंद शिरोडकर, रिद्धी शिरोडकर व सोनाली गावकर यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, हे खून प्रकरण सांजावच्या दिवशी दि. २४ जून २०१७ रोजी रात्री ११.३० वा. सुमारास कळंगुट मासळी मार्केटमध्ये घडले होते. टायरॉन नाझारेथ आपल्या दोघा मित्रांसह मार्केटमध्ये दारू पिण्यासाठी बसला होता व तो बियर आणण्यासाठी बारवर गेला असता तेथे तिन्ही आरोपींनी त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला होता.

आरोपी जोजफ सिक्वेरा याच्यावर मे २०१७ मध्ये टायरॉन नाझारेथ याने तलवारीने हल्ला केला होता. टायरॉनची चार दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती. आपल्यावरील हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी संशयिताने वरील दोघा साथीदारांसह त्याच्यावर खुनी हल्ला करून त्याला ठार केले होते.

आरोपी जोजफ सिक्वेरा, सीऑन फर्नांडिस व महेश रामपाल यांना घटनेच्या दोन दिवसांनी कळंगुट पोलिसांनी अनमोड घाटातून अटक केली होती.

म्हापसा सत्र न्यायालयाने ठोठावली होती जन्मठेप

दरम्यान, ३० मे २०२३ रोजी या खटल्याचा निवाडा म्हापसा अतिरीक्त न्यायालयाने देत वरील तिघानांही जन्मठेपेसह प्रत्येकी १० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली होती. या खून प्रकरणाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी केला होता. 

हेही वाचा