देवगड तालुक्यातील तिर्लोट येथील हृदयद्रावक घटना : किरकोळ वादातून उचलले पाऊल
देवगड : कौटुंबिक वादामुळे पत्नीने आपल्या दोन मुलांसह खाडीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात घडली. पती मुंबईला नांदण्यासाठी नेत नसल्याचा वाद हेच यामागचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी येथे ही घटना घडली असून श्रीशा सूरज भाबल, श्रेयश भाबल व दुर्वेश भाबल अशी मृतांची नावे आहेत. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने देवगड तालुका हादरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिर्लोट- आंबेरी येथील सूरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा २२ जून २०१८ रोजी विवाह झाला होता. सूरज हे रेल्वेमध्ये नोकरीला असून ते मुंबई दादर येथे राहतातन तर श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती.
सूरज - श्रीशा (२४), यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून ती श्रेयश (५) व दुर्वेश (४) या आपल्या मुलांसमवेत सासरी तिर्लोट, आंबेरी येथे सासरे सुहास भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती.
१५ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास श्रीशाने आपल्या पतीशी फोनवर मुंबईला घेऊन जाण्याबाबत बोलत होती. परंतु सूरजने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने तिला मुंबईला घेऊन येण्यास नकार दिला. यावेळी रागाने श्रीशा सासू व सासऱ्यांना न सांगता त्याच सायंकाळी ५.४५ वा. दोन्ही लहान मुलांना घेऊन घरातून निघून गेली. शोधाशोध करूनही सापडून न आल्याने अखेर श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
अखेर १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह १७ एप्रिल रोजी दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळ किनारी सापडला.
या घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, सुनिल पडेलकर, पो. कॉ. बाबाजी कांदे, प्रशांत गावडे, महिला पोलीस वनिता पडवळ यांच्यासह पंचनामा केला.
यावेळी तेथील रामकृष्ण जुवाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुलदीप लिंगायत, पोलीस पाटील अमित घाडी उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. त्या तिघांचे मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर तिथे शवविच्छेदन करण्यात आले.