दोन दुचाकींची समोरासमोर धडक, मयत इसम सोलये होंडा येथील
साखळी : सुपाचीपुड हरवळे साखळी येथे साखळी ते होंडा येथे दोन दुचाकी गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात सोलये होंडा सत्तरी येथील संदीप गावडे (वय ४७) हा इसम जागीच ठार झाला.
उपलब्ध माहितीनुसार सुपाचीपुड हरवळे येथे जीए ०४ झेड ०८५० या होंडा डिओ व जीए ०४ आर ३२२८ या होंडा एक्टिवा या दोन दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत डिओ स्कुटरवरील संदीप गावडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी संदीप याला मृत घोषित केले.
या अपघातात सापडलेल्या होंडा एक्टिवा स्कुटरवरील वाळपई येथील रामा झोरे व लक्ष्मण झोरे हे दोघेही किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताचा डिचोली पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात पाठविण्यात आला. डिचोली पोलीस पुढील तपास करत आहे.