उत्तरीय तपासणी अहवालामुळे 'श्रवण' प्रकरणाची गुंतागुंत वाढली

वाळपई पोलिसासमोर आव्हान; शोकाकुल अवस्थेत पार्थिवावर अंतिम संस्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:59 am
उत्तरीय तपासणी अहवालामुळे 'श्रवण' प्रकरणाची गुंतागुंत वाढली

वाळपई : नगरगाव आंबेडे येथे सोमवारी रात्री संशयास्पद आढळलेल्या श्रवण बर्वे यांच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गुंतागुंत वाढलेली आहे. शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट झाले आहे की श्रावण देविदास बर्वे (२४) यांचा मृत्यू बळजबरीने मान दाबल्याने झालेल्या तीव्र श्वासोच्छवासामुळे झाला. जखमा ताज्या, शवविच्छेदन पूर्व आणि मृत्यूच्या वेळी प्राणघातक होत्या. 

नगरगाव सत्तरी येथील श्रवण देविदास बर्वे यांचा सोमवार रात्री मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. उत्तरीय तपासणी अहवालामुळे आता यासंदर्भाची गुंतागुंत वाढली आहे‌. अजून कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. 

याबाबतची माहिती अशी की नगरगाव आंबेडे येथील हनुमान मंदिरापासून अवघ्याच अंतरावर असलेल्या देविदास बर्वे यांच्या घरासमोरच त्यांच्या मुलाचा म्हणजेच श्रवणचा मृतदेह पडला होता. या ठिकाणी सदर तो सापडला होता त्या भोवताली जागा अस्ताव्यस्त होती. सदर ठिकाणी झटापट झाल्यामुळे यातूनच श्रवण यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आलेले आहे. 

श्रवण बर्वे यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दुपारी त्यांच्यावर उत्तररीय तपासणी करण्यात आली. या संदर्भाचा अहवाल संध्याकाळी प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये श्रवण बर्वे याचा मृत्यू त्याचा गळा आवळल्याने व श्वासोच्छ्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आता दूर झालेला आहे. यामुळे त्यांच्यावर घातपाताची शक्यता निर्माण झालेली आहे. श्वास कोंडणे व गळा दाबणे यामध्ये आणखीन संशयित असण्याची शक्यता नाकारता येण्यासारखे नाही. 

या प्रकरणाचा शोध घेण्याचे आव्हान आता वाळपई पोलिसांसमोर निर्माण झालेले आहे. मंगळवारी दुपारी फॉरेन्सिक पथकातून अनेक महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आलेले आहेत. सदरची चाचपणी करण्यात आल्यानंतर या प्रकरणासंदर्भात अधिक उलगडा होणार आहे. 

संशयाची सुई अजून कुणावरही गेलेली नाही. बुधवारी दुपारी श्रवण यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

रात्री ११ ते सकाळी ५ वेळ महत्त्वाची
दरम्यान सोमवारी संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत श्रवण बर्वे हा हनुमान मंदिरा नजीक असलेल्या घरातील मित्रांसमवेत आयपीएलचा सामना पाहण्यासाठी बसला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सामना संपल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी गेला होता. यामुळे रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सदर घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.