शॉर्टसर्किटमुळे आग : अग्निशमनने ३० लाखांची मालमत्ता वाचवली
म्हापसा : सांगोल्डा येथील कोमुनिदाद कॉलनीच्या लेन ३ मधील एका व्हिलाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ९ लाखांचे नुकसान झाले. दुर्घटनेच्यावेळी व्हिलामधील भाडेकरू कुटुंब घराबाहेर गेले होते.
ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी ५.४० वा. सुमारास घडली. कॉलनीमधील वासू प्रधा या व्हिलामध्ये अचानक आग लागली. हा प्रकार निदर्शनास येताच शेजारील लोकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पर्वरी अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी ओंकार कारबोटकर, हनुमान मळीक, उत्तम कामत, महेश माजिक व लक्ष्मण परवार या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली.
व्हिलामधील वातानुकुलित संचामध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीने पेट घेतला. यात एसी, बेड, सोफा, टेबल, सिलिंग व इतर वस्तू जळून खाक झाल्याने ९ लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने ३० लाखांची मालमत्ता वाचवली आहे.