श्रवण बर्वे खुनाच्या तपासासाठी १८ जणांना ताब्यात घेतल्याने मोर्चा

स्थानिकांचा वाळपई पोलीस स्थानकावर ठिय्या : १५ जणांना सोडले, तिघांची चौकशी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:37 pm
श्रवण बर्वे खुनाच्या तपासासाठी १८ जणांना ताब्यात घेतल्याने मोर्चा

वाळपई : नगरगाव येथील श्रवण बर्वे खुनाच्या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी सुमारे १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस दबावाचा वापर करुन या प्रकरणांमध्ये स्थानिकांना गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना सोडून द्या, अशी मागणी करीत नगरगाव आंबेडे भागातील १०० पेक्षा जास्त नागरिकांनी शुक्रवारी संध्याकाळी वाळपई पोलीस ठाण्यात धडक दिली.

श्रवण देविदास बर्वे याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. गळा दाबून‌ व त्याचा श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते.

वाळपई पोलिसांनी आंबेडे नगरगाव या भागातील सुमारे १८ जणांना शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सर्वांना पर्वरी येथे नेऊन दिवसभर ठेवले.

दिवसभर त्यांची वाट पाहून शेवटी स्थानिकांनी वाळपईच्या पोलीस ठाण्यात धडक दिली. रात्री ८.३० वा. सुमारास सुमारे १०० ग्रामस्थांनी वाळपई पोलीस ठाणे गाठले. याबाबत त्यांनी पोलिसांना जाब विचारला. शेवटी पंधरा जणांना सोडून देण्यात आले. उर्वरित तिघांना कधी सोडणार असा सवाल उपस्थितांनी पोलिसांना केला. पोलीस अधिकाऱ्यांनी एका तासाच्या आत सर्वांना सोडून देण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत त्यांना आमच्या ताब्यात देण्यात येत नाही तोपर्यंत पोलीस स्थानक न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ पोलीस स्थानकावर ठाण मांडून होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना स्थानिकांनी सांगितले की, श्रवण बर्वे याला न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पोलीस चुकीच्या पद्धतीने तपास करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

चौकशीसाठी नेले पर्वरी स्थानकात

पोलिसांकडून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते, नंतर १५ जणांना सोडून देण्यात आले. तिघांना अजूनही चौकशीसाठी पर्वरी या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांना जोपर्यंत सोडण्यात येत नाही तोपर्यंत पोलीस स्थानक न सोडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर एक तासाच्या आत त्यांनाही सोडून देण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.