गोव्यात भटक्या कुत्र्यांची संख्या ६० हजारांच्या आसपास असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारी सर्वेक्षणात हा आकडा ५६ हजार सांगितला जात असला तरी ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
गोव्यात जिकडे जिकडे दिसणारे भटके कुत्रे ही सामान्य जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. जोपर्यंत असे कुत्रे वाढत राहिले पण उपद्रव करीत नव्हते, तोपर्यंत ते धोकादायक वाटत नसत. मात्र अलीकडे कुत्र्यांनी वाटसरूंपासून ते बालकापर्यंत चावे घेण्यास सुरुवात केल्याने प्राण गमावण्याची वेळ आली आहे. बोणबाग-बेतोडा येथील दुर्दैवी घटनेत मामाच्या घरी आलेल्या बालिकेला कुत्रा चावल्याने तत्काळ मृत्यू येण्याची दुर्दैवी घटना चटका लावणारी आहे. कुत्र्यांचे अशा प्रकारे हिंसक होणे कोणाच्याही जीवावर बेतू शकते, असेच या घटनेवरून दिसते आहे. गोव्यात जानेवारीत प्रत्येक दिवशी कुत्र्यांनी ५० हून अधिक जणांचे चावे घेतल्याची आकडेवारी तर भयभीत करणारी आहे. किनाऱ्यावर आता पर्यटक वाढल्याने तेथील कुत्र्यांची संख्या कमी दिसते, त्यामुळे धोका कमी आहे असे अनुमान करणाऱ्या काही दयावान नागरिकांची कीव कराविशी वाटते. माणसाची संख्या वाढली की कुत्रे हल्ले करणार नाहीत, हा समज चुकीचा आहे. किनारपट्टीवरील पर्यटक आणि तेथील रहिवाशी यांना या बेताल कुत्र्यांची भीती वाटत असते. रेबीजग्रस्त कुत्रा चावला तर जीव वाचण्याची शक्यता नाहीच, यामुळे जनतेत एक प्रकारची घबराट निर्माण होणे साहजिक आहे. रस्त्यावरून जाणारा पादचारी असो किंवा दुचाकीवरील चालक असो, कुत्रे ज्यावेळी अचानक हल्ला करतात, त्यावेळी त्यांच्यापासून संरक्षण करणे अतिशय कठीण असल्याचा प्रत्यय अनेकांना आला असेल. वाहनांचा पाठलाग करण्याने तर धोका अधिक वाढतो, कारण चालकाचे वाहनावरील नियंत्रण जाण्याची शक्यता अधिक असते. कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग म्हणून वाहनाचा वेग वाढवल्याने त्याच्या जीवावर बेतू शकते. किनाऱ्यांवर फिरणारे मोकाट कुत्रे हे तर तेथे जाणाऱ्यांना संकट वाटते. याचा परिणाम पर्यटनावर जसा होणार आहे, त्याचप्रमाणे रहिवाशांना अधिक हानी पोचू शकते. समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेली चिंताजनक वाढ दर्शविते की २०२५ च्या अवघ्या तीन महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या पर्यटकांची संख्या २०२३ मधील एकूण प्रकरणांच्या बरोबरीने आहे. २०२२ च्या तुलनेत हा वेग झपाट्याने वाढला आहे, जिथे केवळ एक प्रकरण नोंदवले गेले होते. मोबोर समुद्रकिनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका परदेशी महिलेवर हल्ला केला, ज्यात महिलेच्या शरीरावर १५ चावे झाले आणि तिचा हातही फ्रॅक्चर झाला. भारतीय आणि विदेशी पर्यटक या हल्ल्यांना बळी पडत आहेत.
गोव्यात भटक्या कुत्र्यांची संख्या ६० हजारांच्या आसपास असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारी सर्वेक्षणात हा आकडा ५६ हजार सांगितला जात असला तरी ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यापैकी किती जणांचे लसीकरण करण्यात आले, निर्बिजीकरण करण्यात आले याची माहिती सध्या उपलब्ध नसली तरी संख्या कळल्यावर या मोहिमेस जोर येईल आणि राज्यातील ग्रामीण भागांमध्ये संबंधित संस्थेचे कार्यकर्ते कुत्र्यांना आटोक्यात आणतील असे सांगण्यात येते. गोवा रेबीजमुक्त व्हावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कुत्र्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा मार्ग म्हणून काही विशिष्ट जातींच्या कुत्र्यांना पाळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचे कितपत पालन केले जाते, त्यासंबंधीची कोणती माहिती आतापर्यंत गोळा करण्यात आली आहे, किती कुत्र्यांची नोंदणी करण्यात आली आहे, या माहितीवरच या मोहिमेचे यश अवलंबून असेल. दृष्टी मरीनने लाईफगार्डसना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी कुत्र्यांचा धोका जुळवून घेण्यास आणि त्यात बदल करण्यास प्रवृत्त केले आहे. आक्रमक भटक्या कुत्र्यांना ओळखण्यासाठी आणि हल्ले प्रभावीपणे हाताळण्यासाठी जीवरक्षकांना कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी दृष्टी मरीनने मिशन रेबीजशी करार केला आहे. वाढती प्रकरणे लक्षात घेता, दृष्टी मरीन ही संस्था जीवरक्षकांना भटक्या कुत्र्यांमधील आक्रमकता ओळखण्यासाठी आणि शक्य तितक्या चांगल्या प्रकारे परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित करत आहे, असे सांगण्यात येते. भटक्या कुत्र्यांपासून बचावासाठी जीवरक्षकांनी मिरपूड फवारणी करावी, अशी शिफारस जीवरक्षकांशी संवाद साधणाऱ्या परदेशी नागरिकांनी केली आहे. राज्याच्या अंतर्गत भागांतही कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.