पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांची जेवढी चर्चा होते, तेवढी अन्य मान्यवरांच्या दौऱ्याची नसते. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी नुकताच केलेला पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया या दोन देशांचा दौराही असाच होता. या दौऱ्याने काय साधले?
भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठे पद असलेल्या राष्ट्रपतींचा दौरा माध्यमांमध्ये झाकोळला जाणे ही तशी नवी बाब नाही. एरवी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचे रसभरीत वर्णन होत असते. मोदींभोवतीचे वलय हे त्यामागचे कारण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची साधी राहणी आणि स्वभाव यामुळे कदाचित त्यांना खचितच प्रसिद्धी लाभते. मूर्म यांनी नुकताच दोन देशांचा दौरा केला. हे दोन्ही देश युरोपातील आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि त्या दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगत होणार आहेत. तसेच, आगामी काळात व्यापार, संरक्षण अशा विविध क्षेत्रांना चालनाही मिळणार आहे.
अमेरिकेने जबर आयात शुल्क जाहीर करून स्थगिती दिली असली, तरी भारताला आपल्या मालाची विक्री करण्यासाठी नवी बाजारपेठ शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. खासकरून युरोपातील देश ही उत्तम संधी आहे. तेथील देशांमध्ये जर थेट व्यापार झाला, तर तो अधिक उपयुक्त ठरणार आहे. याचदृष्टीने राष्ट्रपती मूर्मू यांचा पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतो.
राष्ट्रपती सर्वप्रथम पोर्तुगाल येथे गेल्या. गेल्या २७ वर्षांत प्रथमच भारतीय राष्ट्रपतींनी या देशाचा दौरा केला. पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डिसुझा यांनी राजधानी लिस्बन येथे ऐतिहासिक 'प्राका डो इम्पीरियो' येथे मूर्मू यांचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे, भारत-पोर्तुगाल यांच्यातील राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त खास टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रपती मूर्मू आणि डिसुझा यांनी बैठकीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, विज्ञान व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण यावर भर देण्यात आला. या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रपतींनी संयुक्त निवेदन जारी केले.
लिस्बन शहराच्या महापौरांनी 'सिटी की ऑफ ऑनर' हा पुरस्कार देऊन मूर्मू यांना गौरविले. हे शहर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह डिजिटल परिवर्तनामध्ये अग्रभागी आहे. त्यामुळे या शहरासोबत भारतीय शहरांचा सहयोग वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भर दिला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मूर्मू यांनी पोर्तुगालच्या संसदेचे सभापती जोस पेड्रो अगुइर-ब्रैंको यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या संसदीय कामकाजात आदान-प्रदान तसेच सहकार्य वाढविले जावे, यावर चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री लुइस मोंटेनेग्रो यांची भेट घेऊन त्यांच्याशीही द्विपक्षीय संबंधांवर मूर्मू यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर मूर्मू यांनी लिस्बन येथील चंपालिमॉड फाऊंडेशनला भेट दिली. पोर्तुगालमधील भारतीय राजदूतांनी आयोजित केलेल्या विशेष स्वागत समारंभाला उपस्थित राहून मूर्मू यांनी मार्गदर्शन केले. हा दौरा यशस्वी करून राष्ट्रपती स्लोव्हाकिया येथे दाखल झाल्या.
स्लोव्हाकियात जगप्रसिद्ध जग्वार लँड रोव्हर या आलिशान कारची निर्मिती होते. युक्रेन युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतले होते. त्यावेळी स्लोव्हाकियाने भारताला मोठे सहकार्य केले होते. गेल्या २९ वर्षात भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच स्लोव्हाकिया दौरा होता. ब्रातिस्लावा येथे राष्ट्रपती भवनात पीटर पेलेग्रिनी यांनी मूर्मू यांचे स्वागत केले. दोन्ही राष्ट्रपतींमध्ये यावेळी द्विपक्षीय बैठक झाली. विज्ञान, तंत्रज्ञान, माध्यम, मनोरंजन, व्यापार आदींवर यावेळी भर देण्यात आला. मुंबईत मे महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या वेव्ह शिखर परिषदेत स्लोव्हाकियाने सहभाग घ्यावा, अशी विनंती मूर्मू यांनी केली. लघु उद्योगांना सहकार्य आणि विदेश विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अशा दोन सामंजस्य करारांवर दोन्ही राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. राष्ट्रीय कौन्सिलच्या सभापतीपदी रिचर्ड राशी यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यांचीही मूर्मू यांनी भेट घेतली आणि अभिनंदन केले. पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी मूर्म यांनी व्यापक चर्चा केली.
ब्रातिस्लावा येथे दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी स्लोव्हाकिया-भारत व्यापार मंचाला मार्गदर्शन केले. भारताला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आपले योगदान अमूल्य ठरणार आहे. संरक्षण, दूरसंचार, ऑटोमोबाईल, उच्च तंत्रज्ञान आदी क्षेत्रात मोठ्या संधी असून त्याचा लाभ घ्यावा. मेक इन इंडिया या मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रसिद्ध संत कॉन्स्टेंटाइन सिरिल यांचे नाव दिलेल्या नाइट्रा येथील कॉन्स्टेंटाइन द फिलॉसफर विद्यापीठाने मूर्म यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरविले. जग्वारच्या कारखान्यालाही मूर्मू यांनी भेट दिली. भारतीय दूतावास आणि स्लोवाक-भारत मैत्री सोसायटी यांच्यावतीने २०१५ पासून एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात परी कथेत लपलेले सौंदर्य आणि स्लोवाक मुलांच्या नजरेतून भारत या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्या प्रदर्शनाला मूर्मू यांनी भेट दिली. लेनका मुकोवा ही महिला रामायणावर आधारित कठपुतळी शो आयोजित करते. गेल्या ३० वर्षांपासून ती लहान मुलांमध्ये प्रबोधन करीत आहे. तिचेही मूर्मू यांनी कौतुक केले. स्लोवाक राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या विशेष भोजनाला मूर्मू उपस्थित होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. भारतीय मसाले, आयुर्वेद, योगा आदींचा प्रचार, प्रसार तसेच याद्वारे द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. भारतीय राजदुतावासाने आयोजित स्वागत समारंभाला मोठ्या संख्येने भारतीय समुदाय उपस्थित होता. भारतीय व्यापार प्रतिनिधी मंडळाशीही मूर्मू यांनी चर्चा केली.
जागतिक पातळीवर घडणाऱ्या बहुविध घडामोडी पाहता भारताला नवे मित्र तयार करणे आणि व्यापारी बाजारपेठा मजबूत करणे आवश्यक आहे. भारतापासून आखाती देशांमार्गे युरोपपर्यंत आर्थिक कॉरिडॉर विकसित करणे प्रस्तावित आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया या देशांचा यापूर्वी दौरा केला आहे. आता राष्ट्रपतींनी भेट दिल्याने हे दोन्ही देश भारतासोबत आणखी चांगल्या पद्धतीने जोडले जाणार आहेत. नजिकच्या काळात त्यादृष्टीने अनेक घडामोडी तसेच दौरे अभिप्रेत आहेत, हेच राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे फलित आहे.
- भावेश ब्राह्मणकर
(लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे
अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)