तरुणांच्या संख्येत होतेय सातत्याने घट

Story: विश्वरंग |
18th April, 10:02 pm
तरुणांच्या संख्येत होतेय सातत्याने घट

जपानची लोकसंख्या सलग १४ व्या वर्षी घटली आहे. कमी जन्मदराच्या समस्येचा सामना करणाऱ्या जपानसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. जपान सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी एक वेगळे मंत्रालयही स्थापन केले आहे. त्याचबरोबर तरुणांना नातेसंबंध जोडण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. २०२४ च्या आकडेवारीनुसार, देशात ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या २९.३ टक्के आहे. जपानच्या गृह मंत्रालयाने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली. ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, जपानची एकूण लोकसंख्या ज्यामध्ये जपानी आणि तेथे राहणारे परदेशी लोक समाविष्ट आहेत. ही लोकसंख्या १२३ दशलक्ष आहे. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा ५ लाख ५० हजारांनी कमी आहे.

२०११ पासून दरवर्षी जपानची लोकसंख्या अनेक दशलक्षांनी कमी होते. २००८ मध्ये जपानची लोकसंख्या शिखरावर होती. जपानमध्ये वृद्धांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, तर तरुणांची संख्या सतत कमी होत आहे, अशी कठीण परिस्थिती जपानची आहे. 

देशात १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या आता फक्त ११ टक्के आहे यावरून या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेता येतो. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा ३ लाख ४३ हजार कमी आहे. १९७५ पासून जपानमधील तरुणांची संख्या सतत कमी होत आहे. विशेष म्हणजे, जपानमधील वृद्धांची संख्या ३६.२३ दशलक्षांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, वृद्धांची संख्या १७ हजारांनी वाढली आहे.

केवळ जपानी वंशाच्या लोकांबद्दल पाहिल्यास त्यांची लोकसंख्या फक्त १२ कोटी उरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या लोकांची संख्या सुमारे ९ लाखांनी कमी झाली आहे. गेल्या एका वर्षात ३ लाख ४० हजार लोक बाहेरून येऊन देशात स्थायिक झाले आहेत.

जपानचा जन्मदर जगात सर्वात कमी आहे. याचा थेट परिणाम देशातील कामगार वर्गावर झाला आहे. देशात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत आहे. ज्यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांची भरती करण्यात अडचणी येत आहेत आणि ग्राहकांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. दुसरे प्रमुख कारण म्हणजे जपानमधील तरुण उशिरा लग्न करत आहेत. त्यांना मुलांबद्दल विचार करण्यासही उशीर होत आहे. अनिश्चित नोकरीची परिस्थिती, जीवनशैलीतील बदल आणि सामाजिक विचारसरणीतील बदल यामुळे लोक कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळत आहेत. जपानमध्ये आता लग्न आणि कुटुंब हे पूर्वीइतके महत्त्वाचे मानले जात नाही. त्यामुळे तरुणांमध्ये कुटुंब वाढवण्याबाबत उदासीनतेची स्थिती दिसून येत आहे.



- सुदेश दळवी, गोवन वार्ता