एखाद्याला अटक झाली आणि तो तुरुंगात गेला की त्याच्या जागी दुसरा विक्रेता येतो. ही गोव्यातील ड्रग्ज विक्रीची साखळी आहे. ती पूर्णपणे तोडणे अवघड आहे. पण गावोगावी पोचलेल्या ड्रग्जच्या जाळ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न गोवा पोलिसांनी केला तरी गोव्याच्या हितासाठी तो महत्त्वाचा ठरेल.
गोव्यात गेल्या चार-पाच वर्षांमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवायांचे प्रमाण विक्रमी आहे. गोवा पोलिसांनी अनेक वेळा मोठ्या कारवाया करून गोव्यात विक्रीसाठी आणलेले ड्रग्ज जप्त केले असून त्याची विल्हेवाटही लावली. तरीसुद्धा गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराचे संपूर्ण उच्चाटन करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरवर्षी सरासरी १४५ ड्रग्जसंबंधी गुन्हे नोंदवले जातात आणि हे प्रमाण गेल्या पाच वर्षांपासून जवळपास समानच आहे.
या गुन्ह्यांमध्ये विदेशी नागरिक आणि इतर देशातील राज्यांतून गोव्यात आलेल्या लोकांचा सहभागही जवळपास समान आहे. गोव्यातील स्थानिक नागरिकांवरही या कालावधीत ड्रग्जसंबंधी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण फारसे बदललेले नाही. त्यामुळे कारवाया होत असल्या, गुन्हे नोंदवले जात असले, ड्रग्ज जप्त होत असले आणि अटकेचे सत्र सुरूच असले तरी पाच वर्षांतील सर्व गोष्टींचे प्रमाण मात्र तसेच आहे. त्यामुळे, ड्रग्जचे उच्चाटन होत आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. याऐवजी गोव्यात ड्रग्जचा व्यवसाय तसाच सुरू आहे, केवळ पोलिसांना हवे तेव्हा आरोपी पकडले जातात, असे म्हणावे लागेल.
क्राईम ब्रँचने चिकोळणा येथे मोठी कारवाई करत ४.३२ किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आणि तिघांना अटक केली. यात एक महिलाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत तब्बल ४३.२० कोटी रुपये असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे आहे. हे कोकेन विदेशातून आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कोकेनची किंमत पाहता आणि ज्यांना अटक झाली आहे त्यांची स्थिती पाहता या सगळ्या व्यवहारामागे असलेल्या मुख्य सूत्रधारापासून पोलीस बरेच दूर आहेत, हे स्पष्ट आहे. ज्यांना अटक झाली आहे त्यांच्याकडून एवढा मोठा व्यवहार होणार होता असे त्यांना पाहून वाटत नाही. शिवाय हा त्यांचा पहिलाच व्यवहार असण्याची शक्यता नाही. त्यांना मुख्य आरोपी ठरवल्यामुळे तपास याच टप्प्यावर थांबेल. भारतात कोकेनची किंमत साधारणतः २० ते २२ हजार रुपये प्रति ग्रॅम असते, पण पोलिसांनी जप्त केलेल्या कोकेनचा दर १ लाख रुपये प्रति ग्रॅम असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढा महागडा ड्रग्ज ज्या अवस्थेत आढळला, ते पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. हे कोकेन विदेशातून आले असावे यात शंका नाही. म्हणजेच हे पहिल्यांदाच झाले असेल असे मानता येणार नाही. यापूर्वीही असे मोठे व्यवहार झाले असतील. ज्यांना अटक झाली आहे, ते या रॅकेटमधील शेवटच्या स्तरावरील लोक असतील. त्यांच्यामार्फतच खऱ्या सूत्रधारापर्यंत पोचण्याची गरज आहे.
गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराचे कंबरडे मोडण्याची खरी गरज आहे. यापूर्वीही गोव्यातील काही नामांकित नाईट क्लबच्या मालकांना बाहेरील राज्यांतील पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे गोव्यातील किनारी भाग ड्रग्जपासून मुक्त आहे असे कोणी ठामपणे म्हणू शकत नाही. अनेक विदेशी नागरिकही या व्यवसायासाठीच गोव्यात वास्तव्य करून असतात, हेही या प्रकरणातील कारवाया पाहता लक्षात येते.
हल्लीच ‘अटाला’ नावाच्या कुख्यात ड्रग्ज पेडलरला पुन्हा एकदा अटक करण्यात आली. बंगळुरूमधील एका व्यक्तीकडून गोवा पोलिसांनी ११ कोटी रुपयांचा उच्च प्रतीचा गांजाही हल्लीच जप्त केला. याच वर्षी फक्त क्राईम ब्रँचने गेल्या साडेतीन महिन्यांत ८ गुन्हे नोंदवून १९ किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केला आहे, ज्याची किंमत अंदाजे ५५.२७ कोटी रुपये आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाया वेगळ्या. हे सगळे पाहता, कितीही कारवाया झाल्या तरी गोव्यातील ड्रग्ज व्यवहार आटोक्यात येणार नाही हे स्पष्ट दिसते. गेल्या पाच वर्षांत ७२५ ड्रग्जसंबंधी गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये १३२ विदेशी, ४८४ भारतीय परप्रांतीय आणि २४५ गोव्यातील नागरिकांना अटक करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत ४० पेक्षा अधिक गुन्हे आणि तेवढ्याच आरोपींना अटक झाली आहे. विदेशी, परप्रांतीय आणि स्थानिकांची संख्याही फारशी बदललेली नाही. एखाद्याला अटक झाली आणि तो तुरुंगात गेला की त्याच्या जागी दुसरा विक्रेता येतो. ही गोव्यातील ड्रग्ज विक्रीची साखळी आहे. ती पूर्णपणे तोडणे अवघड आहे. पण गावोगावी पोचलेल्या ड्रग्जच्या जाळ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न गोवा पोलिसांनी केला तरी गोव्याच्या हितासाठी तो महत्त्वाचा ठरेल.