गुजरात : अरबी समुद्रात तब्बल १८०० कोटींचे ड्रग्स जप्त

आयजीसी आणि गुजरात एटीएसची संयुक्त कारवाई; मात्र तस्कर पळून जाण्यात यशस्वी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th April, 10:25 am
गुजरात : अरबी समुद्रात तब्बल १८०० कोटींचे ड्रग्स जप्त

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दल (आयजीसी) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी १२-१३ एप्रिल दरम्यान संयुक्त कारवाई करून सुमारे १८०० कोटी रुपये किमतीचा ३०० किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई अरबी समुद्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषेजवळ करण्यात आली.

पकडले जाऊ या भीतीने संशयितांनी ड्रग्ज समुद्रात टाकण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीकडे बोट वळली. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने तात्काळ आपली नौका पथक पाण्यात उतरवून ड्रग्ज जप्त करण्यासाठी बोटीचा पाठलागही सुरू ठेवला.

मात्र, संशयित बोट आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीत प्रवेश करण्यात यशस्वी झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार भारतीय पथकाला पाठलाग थांबवावा लागला. या प्रकरणाची अधिक चौकशी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई ‘ऑपरेशन सागर मंथन’ या विशेष मोहिमेचा भाग आहे. भारताच्या सागरी हद्दीतून होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी २०२४ मध्ये या ऑपरेशनची सुरूवात करण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या ऑपरेशन ब्रांचचे अधिकारी, भारतीय नौदलाची गुप्तचर यंत्रणा, इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांचा समावेश आहे.

गुजरात किनाऱ्याजवळ यापूर्वीही अनेकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मागील वर्षभरात या ऑपरेशन अंतर्गत अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर एकूण ८ मोठ्या कारवाया पार पडल्या. याद्वारे सुमारे ११ इराणी आणि १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आणि तब्बल ३४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. 


हेही वाचा