रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई तीव्र

तीन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांत आरोपपत्राची तयारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th April, 06:00 pm
रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई तीव्र
🚨 महत्त्वाची बातमी

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपासाची गती वाढवली आहे. गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणी एकूण तीन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ईडी लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी वाड्रा यांची चौकशी करण्यात आली असून, ती एकूण १६ तास चालली. सूत्रांच्या माहितीनुसार, एकाचवेळी आरोप निश्चित करण्यासाठी ही समन्वयित कारवाई करण्यात येत आहे.

तीन प्रमुख प्रकरणे

🏢 पहिले प्रकरण

गुरुग्रामच्या शिकोहपूर (सेक्टर ८३) येथील ३.५ एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. वाड्रा यांच्या 'स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी' कंपनीने ती जमीन ७.५ कोटी रुपयांना खरेदी करून काही महिन्यांत डीएलएफला ५८ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. आर्थिक अनियमिततेच्या तक्रारीनंतर २०१८ मध्ये एफआयआर दाखल झाला होता.

✈️ दुसऱ्या प्रकरणात

वाड्रा यांचे ब्रिटनस्थित फरार शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. पिलाटस डीलमधील ३१० कोटींची लाच भंडारीच्या दुबईतील कंपनीत जमा झाली असून, ती रक्कम लंडनमधील मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आली. ईडीने १५० कोटी रुपये शोधून काढल्याचा दावा केला आहे. यामध्ये वाड्रा यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

🏜️ तिसरे प्रकरण

राजस्थानातील बिकानेर जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. स्कायलाईट कंपनीमार्फत विस्थापितांसाठी राखीव असलेली २७५ बिघा जमीन ७२ लाख रुपयांना खरेदी करून ५.२ कोटींना विकल्याचा आरोप आहे.

इतर संशयास्पद व्यवहार

२०२३ मध्ये दाखल एका आरोपपत्रात वाड्रा, प्रियंका वाड्रा व सीसी थंपी यांनी एच.एल. पहवा यांच्याकडून ५३१ एकर जमीन खरेदी करून ती परत विकल्याचा उल्लेख आहे. यावेळी वाड्रा व प्रियंका यांना आरोपी करण्यात आले नव्हते. त्याशिवाय गौतम बुद्ध नगर येथील १२ एकर जमीन व्यवहाराची चौकशीही सुरू आहे.

🗣️ "हा राजकीय सूडबुद्धीचा भाग" : रॉबर्ट वाड्रा

ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना वड्रा यांनी ही संपूर्ण चौकशी राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला. "मी जर भाजपमध्ये असतो, तर हे काही झाले नसते," असे म्हणत त्यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, यापूर्वीच २३,००० पानांचे दस्तऐवज सादर केले असून, ईडी वारंवार तेच प्रश्न विचारत आहे.

हेही वाचा