दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लवकरच; पंतप्रधान मोदींचा पुढाकार

बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली वरिष्ठ नेत्यांची मॅरेथॉन बैठक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 04:46 pm
दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लवकरच; पंतप्रधान मोदींचा पुढाकार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी अमित शहा, राजनाथ सिंह आणि बी.एल. संतोष यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत कर्नाटक, गुजरात, उत्तराखंडसह एक डझन राज्यांतील प्रदेशाध्यक्ष नियुक्तीतील अडथळ्यांवर चर्चा झाली.

उर्वरित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा लवकरच

बैठकीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन-तीन दिवसांत सुमारे सहा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल, असा अंदाज आहे.

नड्डा यांच्या कार्यकाळाचा शेवटचा टप्पा

जेपी नड्डा यांची भाजपच्या पूर्णवेळ अध्यक्षपदी नियुक्ती जानेवारी २०२० मध्ये झाली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्येच पूर्ण झाला होता. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या नड्डा हे राज्यसभेतील सभागृह नेते असून, केंद्र सरकारमध्ये आरोग्य, रसायने आणि खते या मंत्रालयांचे कार्यभारही त्यांच्याकडे आहेत.

संगठनात्मक निवडणुकीत अडथळे

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या संविधानानुसार ‘निर्वाचक मंडळ’ तयार करणे आवश्यक आहे. मात्र अनेक राज्यांतील (कर्नाटक, यूपी, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तराखंड इ.) संगठनात्मक निवडणुका न झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या अडचणींवर उपाय शोधण्यात आला.

२०२९ निवडणुकांचे नेतृत्व

जो नेता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त होईल, तोच २०२९  च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करेल. त्यामुळे संघाचा पाठिंबा, मोदी-शहा यांचा विश्वास, संघटन कौशल्य आणि राजकीय रणनीतीतील चपळता असलेला नेता या पदावर अपेक्षित आहे.

महत्त्वपूर्ण राज्यांत अग्निपरीक्षा

नवीन अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली २०२५ मध्ये बिहार आणि २०२६ मध्ये केरळ, तामिळनाडू, आसाम व पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होतील. हे सर्व राज्ये भाजपसाठी आव्हानात्मक आहेत, त्यामुळे अध्यक्षाची पहिली कसोटी तिथेच लागणार आहे.

नवीन संघटनात्मक रचना

भाजपकडून युवकांना प्राधान्य देत ५० टक्के  नवीन चेहऱ्यांना महासचिव आणि सचिव पदांवर संधी देण्याचा विचार आहे. महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यावरही भर आहे. संसदीय मंडळात मात्र वरिष्ठ नेत्यांना प्राधान्य राहणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवीन अध्यक्ष कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा