श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा यूनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर' मध्ये समावेश

भारतीय ज्ञानपरंपरेचा आंतरराष्ट्रीय गौरव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 04:17 pm
श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा यूनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर' मध्ये समावेश

नवी दिल्ली : भारताच्या प्राचीन तत्त्वज्ञान आणि कलासंस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्रीमद्भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्र यांचा समावेश यूनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर' मध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वरून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक घटनेबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.



संपूर्ण जगभरातील भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. गीता आणि नाट्यशास्त्राचा 'मेमरी ऑफ द वर्ल्ड' रजिस्टरमध्ये समावेश होणे, ही आपल्या शाश्वत ज्ञान आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर मिळालेली मान्यता आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.  याशिवाय हे ग्रंथ जगभरातील सभ्यता आणि मानवतेसाठी प्रेरणास्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या केवळ साहित्यकृती नाहीत, तर त्या भारताच्या तात्त्विक आणि सौंदर्यशास्त्रीय परंपरेचा पाया आहेत. या मान्यतेमुळे आता भारताचे एकूण १४ अभिलेख युनेस्कोच्या रजिस्टरमध्ये समाविष्ट झाले आहेत, असे  केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले. 

‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ म्हणजे काय?

हा उपक्रम यूनेस्कोने १९९२ मध्ये सुरू केला. त्यामध्ये जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या दस्तऐवजांचे जतन केले जाते. या रजिस्टरचा उद्देश महत्त्वपूर्ण माहितीचा वारसा सुरक्षित ठेवणे व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि कला परंपरेला मिळालेला हा सन्मान जागतिक पातळीवर भारताच्या सांस्कृतिक नेतृत्वाची साक्ष देतो. या यशामुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याआधी गेल्यावर्षी  रामचरितमानस, पंचतंत्र आणि साहित्य-लोक या भारतीय साहित्यकृतींचा समावेश यात करण्यात आला होता. 

हेही वाचा